कोल्हापूर : राज्याच्या विविध क्षेत्रांत शाश्वत विकास होण्याच्या दृष्टीने जिल्हा हा विकासाचा केंद्रबिंदू मानून पुढील पाच वर्षांसाठी प्रत्येक शासकीय यंत्रणेने आपल्या विभागाचे ‘व्हिजन २०२२’ तयार करावे, या साठी कामाला लागा, असे निर्देश जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी शुक्रवारी येथे दिले.
जिल्हा सर्वसाधारण वार्षिक योजना आणि अनुसूचित जाती उपयोजना अंतर्गत कामांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील महाराणी ताराबाई सभागृहात बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होेते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार, उपवनसंरक्षक प्रभूनाथ शुक्ल, जिल्हा नियोजन अधिकारी सरिता यादव आदींची प्रमुख उपस्थिती होती.
राज्याच्या विविध क्षेत्रांत शाश्वत विकास होण्याच्या दृष्टीने जिल्हा हा विकासाचा केंद्रबिंदू मानून पुढील पाच वर्षांसाठी प्रत्येक शासकीय यंत्रणेने आपल्या विभागाचे ‘व्हिजन २०२२’ तयार करावे, असे निर्देश शासनाने दिले असून त्याची अंमलबजावणी करून यंत्रणांनी त्वरित ‘व्हिजन २०२२’ सादर करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी सुभेदार यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी सुभेदार म्हणाले, जिल्हा वार्षिक आराखड्यांतर्गत समाविष्ट कामांसाठी संबंधित शासकीय यंत्रणांनी प्रशासकीय मान्यतेसाठी प्रस्ताव त्वरित सादर करावेत. आतापर्यंत करण्यात आलेल्या कामांची ज्या यंत्रणांनी उपयोगिता प्रमाणपत्रे सादर केलेली नाहीत त्यांनी ती त्वरित सादर करावीत. नावीन्यपूर्ण योजनेतून अभिनव संकल्पना राबविण्यासाठीही यंत्रणांनी प्रस्ताव द्यावेत. जिल्'ाशी निगडित महत्त्वाच्या विषयांवरील बैठकांना जे अधिकारी उपस्थित राहणार नाहीत त्यांना ‘कारणे दाखवा नोटिसा’ देण्यात येतील.
यावेळी जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी १३ कोटी वृक्षलागवड अभियानांतर्गत जिल्'ाला देण्यात आलेल्या २२ लाख ४४ हजार वृक्षलागवड अभियानाचा आढावा घेतला तसेच जिल्हा सैनिक कल्याण विभागाला देण्यात आलेले ध्वजनिधीचे उद्दिष्टही पूर्ण करण्यात यावे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी विविध शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते.कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी आयोजित जिल्हा वार्षिक योजनेच्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी मार्गदर्शन केले. यावेळी उपवनसंरक्षक प्रभूनाथ शुक्ल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार, जिल्हा नियोजन अधिकारी सरिता यादव उपस्थित होते.