कोल्हापूर : सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाच्या तिसऱ्या दिवशीही सर्व शासकीय कार्यालयांचा आणि शाळांचा परिसर गुरुवारी ओस पडला होता. आधीच संप आणि त्यातही कोल्हापूर येथे मराठा आरक्षणासाठी कडकडीत बंद पाळण्यात आल्याने अधिकाऱ्यांनी आपापल्या ठिकाणी बसूनच काम हातावेगळे करण्याचा प्रयत्न केला.जिल्ह्यातील १९,३१४ कर्मचाऱ्यांपैकी १३,७९७ कर्मचारी तिसऱ्या दिवशीही संपात सहभागी झाले होते. जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या आवाहनानुसार बहुतांशी शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या. मात्र, शैक्षणिक व्यासपीठाच्या आवाहनानुसार ज्या काही मोजक्या शाळा सुरू होत्या, त्यांचेही शिक्षक गुरुवारी संपात सहभागी झाले होते. त्यामुळे शहर आणि जिल्ह्यातील सर्वच्या सर्व शाळा बंद राहिल्या.येथील छत्रपती प्रमिलाराजे छत्रपती जिल्हा रुग्णालयामध्ये दैनंदिन सरासरी १२00 ते १३00 रुग्ण उपचार आणि तपासणीसाठी येतात; परंतु बंदमुळे हा आकडा १00 वरच आला होता. ‘कोल्हापूर बंद’च्या पार्श्वभूमीवर सर्व शासकीय अधिकाऱ्यांना आपापल्या कार्यालयांमध्ये उपस्थित राहणे बंधनकारक करण्यात आले होते.