(आॅनलाईन नको) घरी थांबलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांना कार्यालयात जाण्याचा मार्ग मोकळा: तहसीलदारांकडून मिळणार आॅनलाईन परवानगी :प्रवीण देसाई-
कोल्हापूर : सर्व सरकारी कार्यालयातील उपस्थिती १० टक्के ठेवण्याचे निर्देश राज्य सरकारने दिले आहेत. त्यानुसार कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहावे असे आदेश कर्मचा-यांना संबंधित आस्थापनांकडून दिले आहेत; परंतु अनेक अधिकारी-कर्मचारी आपापल्या गावी थांबल्याने त्यांना येण्यास अडचणी निर्माण होत आहेत. ही अडचण लक्षात घेऊन जिल्हाधिका-यांनी तहसीलदारांना आॅनलाईन परवानगी देण्याचे अधिकार दिले आहेत. त्यामुळे घरी थांबलेल्या कर्मचाºयांना आपल्या कार्यालयात येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या ‘लॉकडाऊन’मुळे सरकारी कार्यालयातील उपस्थितीवरही निर्बंध आले होते. सर्वच शासकीय कार्यालयांत पाच टक्के उपस्थिती होती; परंतु काही दिवसांपूर्वी सरकारने यामध्ये शिथिलता आणत १० टक्के उपस्थिती ठेवण्याचे निर्देश दिले; परंतु गावात थांबलेल्या अधिकारी व कर्मचाºयांना आपापल्या कार्यालयात येण्यास अडचणी निर्माण होत आहेत. त्यांच्याकडे परवानगीचे पास किंवा कोणतेही शासकीय पत्र नसल्याने प्रत्येक ठिकाणी अडवाअडवी होत आहे.
यासाठी जिल्हाधिका-यांनी तहसीलदारांना आॅनलाईनद्वारे परवानगीचे पास देण्याचे अधिकार दिले आहेत. यामुळे घरबसल्या अधिकारी, कर्मचा-यांनी ‘अॅप’वर शासन तसेच संबंधित आस्थापनांकडून आलेले आदेश, त्याचबरोबर आपल्या आस्थापनेची ओळखपत्रे अपलोड करायची आहेत. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर तहसीलदार त्यांना आॅनलाईनद्वारे परवानगीचे पत्र देणार आहेत. याची प्रिंट काढून संबंधित अधिकारी व कर्मचा-याने आपल्यासोबत ठेवायची आहे.
या निर्णयामुळे जिल्ह्याच्या कानाकोप-यातील सर्वच विभागांच्या अधिकारी व कर्मचा-यांना तालुक्यासह जिल्ह्याच्या ठिकाणी तसेच परजिल्ह्यांतील शासकीय कार्यालयांमध्ये येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. परवानगी देण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाल्याचे सूत्राकडून सांगण्यात आले.