कोल्हापूर : शहराची थेट पाइपलाइन महाविकास आघाडीला पूर्ण करता आली नाही. हे काम आम्हीच पूर्ण करू, असा विश्वास राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी व्यक्त केला. शासकीय विश्रामगृहावर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.पाटील यांनी दिवाळीचे औचित्य साधून विश्रामगृहावर विविध क्षेत्रांतील मान्यवरांसह कार्यकर्त्यांच्या भेटी घेतल्या. ते म्हणाले, थेट पाइपलाइन योजना बरीच वर्षे रखडली आहे. महाविकास आघाडीला ती पूर्ण करता आली नाही. राज्यातील शिंदे फडणवीस सरकार हे सर्वसामान्यांचे संवेदनशील सरकार आहे, त्यामुळे ही योजना आम्हीच पूर्ण करू.शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय तातडीने घेण्याची आमची भूमिका आहे. म्हणून गेली अनेक वर्षे लांबलेला भूविकास बँकेच्या कर्जदार शेतकऱ्यांचा विषय आम्ही संपविला. त्या शेतकऱ्यांचा सातबारा आम्ही कोरा केला. सुमारे ६३ हजार शेतकऱ्यांना याचा लाभ मिळाला. महाविकास आघाडी सरकारने केवळ घोषणाबाजी केली. मात्र, आम्ही त्वरित निर्णय घेऊन त्याचा लाभही मिळवून देत आहोत.अभियांत्रिकी महाविद्यालय लवकरचकोल्हापुरात लवकरच शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू करणार आहोत. यासाठी जागेची निश्चिती अंतिम टप्प्यात आली असून, लवकरच प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात होईल, असेही चंद्रकांत पाटील यांनी यावेळी सांगितले.
कोल्हापुरात लवकरच शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू करणार - मंत्री चंद्रकांत पाटील
By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2022 5:17 PM