आॅनलाईन लोकमतकोल्हापूर, दि. १८ : सांस्कृतिक व पारंपरिक कलेची लोकांना माहिती व्हावी तसेच त्याचे जतन व संवर्धन करण्यासाठी सांस्कृतिक क्षेत्रात काम करणा-या कोल्हापूर जिल्ह्यातील ११ नोंदणीकृत संस्थांना राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत प्रोत्साहन म्हणून अनुदान देण्यात आले. कोल्हापूरातील देवल क्लबसह पाच संस्थांना प्रत्येकी १ लाखाची मदत मुंबईत झालेल्या कार्यक्रमात देण्यात आली.
प्रयोगात्मक कलेल्या क्षेत्रात कार्य करणाऱ्या राज्यातील ३0 नोंदणीकृत संस्थांना तर ७३ कलापथकांचा या अनुदान प्राप्त संस्थांना हे अनुदान सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते प्रभादेवी येथील रविंद्र नाटय मंदिर येथे पारंपारिक कलापथकांना वितरित करण्यात आले. पूर्णवेळ तमाशा, हंगामी तमाशा, संगीतबारी, दशावतार, खरी गंमत, शाहीरी, आदी कलापथकांचा यात समावेश आहे.
कोल्हापूरातील गायन समाज देवल क्लब या संस्थेला शास्त्रीय संगीत विभागात पं. भीमसेन जोशी यांच्या नावे दिली जाणारी तसेच हंगामी तमाशा विभागात कांडगाव येथील सुनीता सुरेश कांडगावकर लोकनाट्य तमाशा मंडळ, यादवनगरी येथील रेखा पाटील कोल्हापूरकर लोकनाट्य तमाशा मंडळ आणि संगीतबारी कलापथक या विभागात कुंभोज येथील रघुनाथ दुर्गेवाडीकर लोकनाट्य तमाशा मंडळाला प्रत्येकी १ लाख रुपयांची मदत देण्यात आली.
याशिवाय शास्त्रीय संगीत प्रकारात कोल्हापूरच्या गुणीदास फौंडेशन आणि आवळी बुद्रूक येथील श्री संत सदगुरु बाळुमामा ट्रस्टला प्रत्येकी ५0 हजार रुपयांची संगीतबारी प्रकारात कणेरीवाडी येथील अनिता सुमन दहिवाडकर संगीतबारी पार्टी, सम्राटनगर येथील सुवर्णा गायत्री कोल्हापूरकर संगीतबारी पार्टी तर यादवनगर येथील गुंफा कोल्हापूरकर संगीतबारीला प्रत्येकी २५ हजार आणि शाहिरी प्रकारात बेलवळे, ता. कागल येथील शाहीर विलास साताप्पा पाटील यांना पाच हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली.
महाराष्ट्रातील लोककलावंतांनी पारंपारिक कलेचा सांस्कृतिक वारसा जपून ठेवला आहे. त्यामुळे मला नेहमीच या लोककलावंतांशी संवाद साधायला आवडते अशा शब्दात सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांनी याप्रसंगी लोककलावंतांविषयी आपली भूमिका स्पष्ट केली.
लोककलावंतांच्या कलापथकांना भांडवली अनुदान
महाराष्ट्राच्या सर्व लोककला टिकून राहाव्यात, या लोककलेची पुढील पिढीला माहिती व्हावी आणि महाराष्ट्रातील एकूणच सर्व पारंपरिक लोककलांचे जतन करण्यासाठी या लोककलांना उत्तेजन देण्याच्या हेतूने भांडवली व प्रयोग अनुदान मंजूर करण्यात येते. विशेषत: ग्रामीण भागात तमाशा, लावणी, दशावतार, खडीगंमत, शाहिरी आदी कला सादर करणा-या लोककलांच्या कलापथकांना ७३ संस्थांना ४५ लाख रुपयांचे अर्थसहाय्य वितरीत करण्यात येते.