बेळगाव : कर्नाटक सरकारने कोविड १९ खबरदारीसंदर्भात काही नवे निर्णय घेतले असून, काही बदल केले आहेत. याबाबत मंगळवारी आदेश बजावला आहे. कर्नाटकातून काही काम किंवा समारंभासाठी महाराष्ट्रात गेलेल्या, दोन दिवस तेथे राहिलेल्या आणि परतीच्या प्रवासात पुन्हा कर्नाटकात येणाऱ्या प्रवाशांना आरटीपीसीआरचे बंधन असणार आहे.केवळ दोन दिवस महाराष्ट्रात राहून परत येणाऱ्यांना आरटीपीसीआर टेस्ट करण्याचा निर्णय यापूर्वी घेण्यात आला होता. मात्र, आता या प्रकारची सक्ती होणार नाही, असेच कर्नाटक सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाने स्पष्ट केले आहे.
संबंधित प्रवाशाने कोविड १९ लसीकरणाचे दोन्ही दोन डोस घेतलेले असणे गरजेचे आहे. परतीचा प्रवास करताना ताप, सर्दी, खोकला, घसादुखी आणि श्वसनाचे रोग आदी लक्षणे आढळल्यास आरटीपीसीआर चाचणी करावी लागणार आहे. त्याचबरोबरीने परतीचा प्रवास केल्यानंतर संबंधित प्रवाशाने सात दिवस आपल्या तब्येतीची काळजी जबाबदारीने घेणे गरजेचे आहे. दरम्यान, आपण महाराष्ट्रात फक्त दोनच दिवसांसाठी गेलो होतो, याचे प्रमाणपत्र मात्र संबंधितांना तपासणी नाक्यावर द्यावे लागणार आहे. बस तिकीट किंवा इतर कोणत्याही प्रकारचा पुरावा दिला गेल्यास आरटीपीसीआर नसतानादेखील कर्नाटकात पुन्हा प्रवेश करण्याची संधी अशा प्रवाशांना मिळणार असल्याची माहिती कर्नाटक सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाने दिली आहे.