कोल्हापूर : कोल्हापूरमध्ये पुढील वर्षापासून शासकीय फार्मसी महाविद्यालय सुरू करण्याची घोषणा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी गुरूवारी केली. शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या इमारत भूमीपूजनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी खासदार धनंजय महाडिक यांची प्रमुख उपस्थिती होती. पाटील म्हणाले, कौशल्यपूर्ण मनुष्यबळ उपलब्धतेचे आपल्यासमोर मोठे आव्हान असून जगातील अनेक देश यासाठी भारतावर अवलंबून आहेत. कोट्यवधी महिलांना दुपारच्या चार तासात रोजगार देण्यासाठीचा आपला मानस असून त्यासाठी आवश्यक असे छोटे अभ्यासक्रम तंत्रनिकेतनने तयार करावेत. या महाविद्यालयासाठी आणि अन्य इमारतींसाठी १७५ कोटी रूपये मंजूर करण्यात आले आहेत. तंत्रनिकेतनेदेखील विविध पूरक अभ्यासक्रमांनी सुसज्ज करण्यात येत असून प्रयोगशाळांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अधिक कौशल्ये मिळावीत यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यावेळी महाडिक यांच्यासह तंत्रशिक्षण संचालनालयाचे संचालक विनोद मोहितकर, महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाचे डॉ. प्रमोद नाईक यांची भाषणे झाली.
कोल्हापूरला शासकीय फार्मसी पदवी महाविद्यालय, मंत्री चंद्रकांत पाटील यांची घोषणा
By समीर देशपांडे | Published: September 19, 2024 3:41 PM