कोल्हापूर : जिल्ह्याला महापुराने वेढताच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीच्या ५०० आपदा मित्रांनी अहोरात्र पुरात अडकलेल्या लोकांना बोटीच्या साहाय्याने बाहेर काढले. स्वत:च्या जिवाची बाजी लावणाऱ्या हे आपदा मित्र नि:शुल्क सेवा बजावत आहेत. त्यांच्या मेहनतीची दखल घेत त्यांना मानधन मिळावे; यासाठी शासनाला प्रस्ताव पाठविणार असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी सांगितले.जिल्ह्यात आपत्ती उद्भवल्यानंतर तिचा सामना करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने तगड्या तरुण-तरुणींची भरती केली. सुमारे ५०० आपदा मित्र नियुक्त केले. त्यांना पुरामध्ये, आगीमध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे प्रशिक्षणही दिले. अतिवृष्टीमुळे कोल्हापूरला महापुराने वेढा दिला. पुरात अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी आपदा मित्र सज्ज झाले.
शिवाजी पूल, शिरोळ, हातकणंगले, सांगली फाटा, तावडे हॉटेलसह शहरात आदी ठिकाणी आपदा मित्रांनी पूरग्रस्तांना बाहेर काढण्याचे काम केले. सुमारे ९६ तरुणी धाडसाने पाण्यात उतरून पूरग्रस्तांना बाहेर काढताना दिसत होत्या. गेल्या २९ दिवसांत त्यांनी हजारो लोकांना पुराच्या पाण्यातून बाहेर काढत त्यांचा जीव वाचविला. भविष्यात आपले चांगले होईल, या आशेपोटी हे आपदा मित्र नि:शुल्क अहोरात्र काम करीत आहेत.
आम्ही घरदार सोडून दुसऱ्यांचा जीव वाचविण्याचे काम करीत आहोत; परंतु शासनाकडून आम्हाला मानधन मिळत नसल्याची खंत त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली होती. त्याची गांभीर्याने जिल्हाधिकारी कार्यालयाने दखल घेत शासनाला प्रस्ताव पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. शासनाने या प्रस्तावाला तत्काळ मंजुरी देण्याची गरज आहे.