कोल्हापूर : छत्रपती घराणे ही कोल्हापूरची अस्मिता आहे. त्यामुळे खासदार संभाजीराजे आणि मराठा कार्यकर्त्यांच्या विरोधात जर काही आततायीपणे पाऊल उचलले गेल्यास त्याची फार मोठी किंमत महाविकास आघाडी सरकारला मोजावी लागेल. कारवाई केल्यास राज्यभर लाखोंच्या संख्येने जेलभरो आंदोलन केले जाईल, असा इशारा कोल्हापुरातील सकल मराठा समाजाने सोमवारी पत्रकाव्दारे दिला.
मराठा समाजाच्या आरक्षणासाठी नांदेड येथे खासदार संभाजीराजे आणि मराठा कार्यकर्त्यांनी मूक आंदोलन केले. त्यातील कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करून हे आंदोलन चिरडण्याच्या राज्य सरकारच्या प्रकाराचा सकल मराठा समाजाच्यावतीने निषेध करण्यात येत आहे. समाजाची ओबीसी प्रवर्गामध्ये नोंद होऊन या प्रवर्गाला मिळणाऱ्या सवलती मिळाल्याशिवाय आंदोलन थांबणार नाही, याची दखल राज्य शासनाने गांभीर्याने घ्यावी. कोरोनाच्या कालावधीत मंत्री, नेते, आमदार, खासदार यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रम हे प्रचंड जनसंख्येच्या उपस्थितीत पार पडले. त्याबाबत किती मंत्री, आमदार, खासदार यांच्याविरोधात गुन्हे दाखल झाले, याची माहिती गृहखात्याने जाहीर करावी. आरक्षणासाठी नांदेडसह संपूर्ण राज्यात झालेल्या विविध आंदोलनांत मराठा समाजातील कार्यकर्त्यांवर नोंद झालेले गुन्हे ताबडतोब रद्द करावेत, अशी मागणी सकल मराठा समाजाच्यावतीने बाबा पार्टे, निवास साळोखे, जयकुमार शिंदे, किशोर घाटगे, अर्जुन नलवडे, उदय पाटील आदींनी केली.
चौकट
विधेयक तातडीने मंजूर करावे
मराठा आरक्षणासाठी नवीन मागासवर्गीय आयोगाची स्थापना शासनाने करावी. ओबीसी प्रवर्गात मराठा समाजाला सामील करण्याचे विधेयक तातडीने मंजूर करून हे आरक्षण कायदेशीर पूर्ण करून द्यावे. याबाबत शासनाने वेळकाढूपणा, चालढकल करू नये, अशी मागणी मराठा समाजाने केली.