कोल्हापूर : केंद्र सरकार भाजपशासित राज्यात कामगारांसह विविध कायद्यांमध्ये बदल करत आहे; परंतु ही वेळ महाराष्ट्रात येऊ न देता येथील एकाही कायद्याला या सरकारला नख लावू देणार नाही, असा इशारा आमदार भाई जगताप यांनी सोमवारी येथे दिला. राजर्षी शाहू स्मारक भवन, दसरा चौक येथे भारतीय कामगार कर्मचारी महासंघातर्फे विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज संस्था मतदारसंघातून विजयी झालेल्या आ. भाई जगताप व आ. सतेज पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमात श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते आ. भाई जगताप व आ. सतेज पाटील यांचा शाल, श्रीफळ, मानपत्र व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी महापौर अश्विनी रामाणे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील, माजी मंत्री प्रकाश आवाडे, जालन्याचे माजी आमदार भवानीदास कुलकर्णी, महासंघाचे राज्य सरचिटणीस दिलीप जगताप, मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक, श्रीरंग बरगे, किशोर जमादार, समीर काळे, सत्कार समितीचे अध्यक्ष उदय जाधव, आदींची उपस्थिती होती. भाई जगताप म्हणाले, लोकशाहीची उभारलेली मंदिरे आहेत, ती कष्टकरी व कामगारांच्या जिवावरच आहेत. १३६ वर्षांतील देशातील कामगार चळवळीतील सर्वांत मोठी चळवळ कर्मचारी महासंघाची आहे. दर्जा उंचावून काम केल्याबद्दल ‘आयएसओ-९०००’ हे प्रमाणपत्र मिळाले आहे. ते पुढे म्हणाले, शेतकरी व कामगारांच्या प्रश्नावर भाजप सरकारची भूमिका सकारात्मक नाही. त्यामुळे शेतकरी व कामगार हा वर्ग नजरेसमोर ठेवून सरकारविरोधात भविष्यात फार मोठ्या संघर्षासाठी सज्ज राहावे लागणार आहे. आ. सतेज पाटील म्हणाले, सध्याचा काळ हा जनतेसाठी खडतर आहे. शेतकरी व सामान्यांना न्याय देण्याची भूमिका काँग्रेसने घेतली. याउलट सरकारचे काम सुरू आहे. सहा महिन्यांत मोबाईलची बिले वाढवून एक लाख कोटी फोन कंपन्यांना देण्याचे काम या सरकारने केले आहे. सर्वसामान्यांच्या खिशात हात घालून पैसे काढून घेण्याचे काम हे सरकार करत आहे. पी. एन. पाटील म्हणाले, ‘अच्छे दिन’वाल्या सरकारने कामगारांसाठी नवीन कायदा करून खासगी कंपन्यांमधील कामगार कमी करण्याचा घाट घातला आहे. कामगारांना जवळ करणारा नेता हा काँग्रेसचाच आहे, तर हे सरकार अदानी, अंबानी अशा उद्योगपतींना मिठी मारताना दिसत आहे. प्रकाश आवाडे म्हणाले, मुंबई व कोल्हापूर विधान परिषदेची निवडणूक राज्यात अटीतटीची झाली. त्यामध्ये भाई जगताप व सतेज पाटील यांनी संघर्ष करत विजय संपादन केला. राजकीय विश्लेषणाच्या दृष्टीने ही महत्त्वाची निवडणूक ठरली आहे. कारण जनतेच्या मनातील निकाल या निमित्ताने लागला आहे. (प्रतिनिधी)
सरकारला एकाही कायद्याला नख लावू देणार नाही
By admin | Published: February 02, 2016 1:08 AM