कोल्हापूर : समाजात वाचनसंस्कृती रुजविण्यासाठी शासन फिरते ग्रंथालय, भिलारसारख्या ‘पुस्तकांच्या गावा’ची उभारणी अशा विविध माध्यमांतून प्रयत्न करीत आहे. मात्र वाचनसंस्कृती वाढविण्यासाठी जिल्ह्यातील ग्रंथालयांनी वाचन चळवळीत अधिक सक्रिय होणे गरजेचे आहे, असे मत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी व्यक्त केले.शाहू स्मारक भवनात उच्च व तंत्रशिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय, महाराष्ट्र राज्य जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्या विद्यमाने आयोजित ग्रंथोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ विचारवंत डॉ. अशोक चौसाळकर, खासदार धनंजय महाडिक, जिल्हा ग्रंथालय संघटनेचे अध्यक्ष तानाजी मगदूम उपस्थित होते.जिल्हा ग्रंथालय अधिकारी अपर्णा वाईकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. जिल्हा ग्रंथालय संघटनेचे अध्यक्ष तानाजी मगदूम यांनी मनोगत व्यक्त केले. आनंदा शिंदे यांनी आभार मानले.
उद्घाटनानंतर दुपारी ज्येष्ठ विचारवंत राजाभाऊ शिरगुप्पे यांनी ‘राष्ट्रपिता महात्मा गांधी व आजचा संदर्भ’ या विषयावर व्याख्यान दिले. त्यानंतर प्रा. डॉ. डी. ए. देसाई यांनी ‘पु. ल. देशपांडे- महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व’ या विषयावर विवेचन केले.
ग्रंथदिंडीने सुरुवातग्रंथोत्सवाच्या उद्घाटनापूर्वी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सुनीलकुमार लवटे यांच्या हस्ते ग्रंथपूजनाने ग्रंथदिंडी काढण्यात आली. दसरा चौकातील राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्यापासून ग्रंथदिंडीस सुरुवात करण्यात आली.