कोल्हापूर : ‘चिकन खाल्ल्याने कोरोनाची लागण होते’, असा अप्प्रचार करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार असून, याबाबत दुग्धविकास व पशुसंधर्वन मंत्री सुनील केदार यांच्याशी चर्चा झालेली आहे. त्याचबरोबर यामुळे पोल्ट्रीधारकांचे मोठे नुकसान झाल्याने त्यांना काहीतरी मदत करण्यासाठी सरकारच्या पातळीवर प्रयत्न सुरू असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी शिष्टमंडळाला दिली.जिल्ह्यात साडेचार हजार पोल्ट्रीधारक शेतकरी आहेत. शेतीला जोड व्यवसाय म्हणून यामध्ये शेतकºयांनी लाखो रुपयांची गुंतवणूक केली आहे. मात्र, पोल्ट्रीतील कोंबड्या खाल्ल्यानंतर कोरोना विषाणूची बाधा होते, अशी अफवा पसरवल्याने पोल्ट्रीधारक अक्षरश: रस्त्यावर आले आहेत.
लाखो रुपयांची गुंतवणूक केली, त्यातच ‘कडकनाथ’च्या घोटाळ्यानंतर शेतकरी या व्यवसायाकडे वळले, मात्र पुन्हा त्यांच्यावर ‘कोरोना’च्या रूपाने संक्रांत आली आहे. या संकटामुळे पोल्ट्रीधारक हवालदिल झाल्याने त्यांनी रविवारी मंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेऊन मदतीची मागणी केली.मंत्री मुश्रीफ म्हणाले, चिकन आणि ‘कोरोना’ याबाबत ज्यांनी अफवा पसरवली, त्यांचा शोध सरकार घेत आहे. पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांच्याशी याबाबत चर्चा झाली असून, संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यास सांगितले आहे. या संकटामुळे पोल्ट्रीधारकांचे मोठे नुकसान झाले असून, त्यांना काय मदत करता येईल, याबाबत सरकार गांभीर्याने विचार करीत आहे. येत्या आठ-दहा दिवसांत याबाबत निर्णय घेतला जाईल.