आॅनलाईन लोकमत
कोल्हापूर, दि. २७ : काँग्रेस आघाडी सरकारने संपूर्ण देशातील शेतकऱ्यांची ५२ हजार कोटींची कर्जमाफी केली होती. मग केवळ राज्यातील शेतकऱ्यांना ३४ हजार कोटींची कर्जमाफी कशी? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शेतकऱ्यांसह इतर वर्गाची दिशाभूल करत असून या माध्यमातून शेतकऱ्यांची प्रतिमा मलीन करण्याचा डाव असल्याची टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक खासदार राजू शेट्टी यांनी ‘लोकमत’शी बोलताना केली.
राज्य सरकार कर्जमाफीच्या आकड्याचा खेळ करत आहे. ९० लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ झाल्याचा भुलभुलैय्या सुरू असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेल्या आकडेवारीचा हिशेबच लागत नाही. चाळीस लाख शेतकऱ्यांचा सात/बारा कोरा होऊन ४५ लाख नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांनाही लाभ होणार असून आतापर्यंतच्या कर्जमाफीपेक्षा सर्वांत मोठी कर्जमाफी केल्याचा दावा सरकार करत आहे. कॉँग्रेस आघाडी सरकारने २००८ ला संपूर्ण देशातील शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली होती. त्यामध्ये तर २०-२० लाख थकबाकीदार शेतकऱ्यांना लाभ मिळाला होता. किती शेतकऱ्यांना नेमका कर्जमाफीचा लाभ झाला, असा प्रश्न संसदेत केल्यानंतर तत्कालीन अर्थमंत्र्यांनी ५२ हजार कोटी शेतकऱ्यांना लाभ झाल्याचे सांगितले होते. मग मुख्यमंत्री फडणवीस यांनी केवळ महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे ३४ हजार कोटींचे कर्जमाफ कसे केले? हा खरा प्रश्न असून या सरकारने तर दीड लाखापेक्षा एक रुपयाही कर्ज माफ केलेले नाही, मग ३४ हजार कोटींचा आकडा काढला कोणी? असा सवालही खासदार राजू शेट्टी यांनी केला.
शेतकऱ्यांना ३४ हजार कोटींची कर्जमाफी करून शेतकरी अजून समाधानी नाही, असे इतर वर्गाला भासवण्यासाठीच सरकारची उठाठेव सुरू आहे. कदाचित शेतकऱ्यांची प्रतिमा मलिन करण्याचा डाव सरकारचा आसू शकतो, असेही शेट्टी यांनी सांगितले. शेतकऱ्यांमध्ये अजूनही अस्वस्थता! सरकार ३४ हजार कोटींची कर्जमाफी केल्याचा कांगावा करते, मग शेतकऱ्यांमध्ये अजूनही अस्वस्थता कशी? याचे उत्तर सरकारने शोधले तर कर्जमाफीचे खरे फलित समोर येईल, असेही शेट्टी यांनी सांगितले.