भरत शास्त्री ।बाहुबली : राज्य शासनाकडून शालेय जीवनात संशोधन करणाºया बालवैज्ञानिकांची उपेक्षा होत असल्याचे चित्र आहे. शासनाला शालेय अभ्यासक्रमात विज्ञान विषय असतो आणि शालेय विद्यार्थीदेखील अनेक विज्ञान प्रदर्शनांमध्ये सहभाग घेऊन यशस्वी होतात पण त्यांच्या बुद्धिमत्तेचा जणू सरकारला विसर पडला आहे की काय, असा प्रश्न पालक, विद्यार्थी व शिक्षकांना पडला आहे. कारण ही तसेच आहे, शासन इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना क्रीडा आणि कलाक्षेत्रात विशेष प्रावीण्य मिळविल्याबद्दल सवलतीचे विशेष गुण देते; पण विविध विज्ञान प्रदर्शनांमध्ये यशस्वी होणाºया बालवैज्ञानिकांना मात्र दुर्लक्षित केले जात असल्याचे चित्र आहे.
सध्या राज्यामध्ये क्रीडा आणि कला क्षेत्रामध्ये प्रावीण्य मिळवणाºया दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना सवलतीचे वाढीव गुण मिळतात. क्रीडा स्पर्धांमध्ये ४९ प्रकारच्या खेळांचा समावेश आहे.जिल्हा, विभागस्तर, राज्यस्तर, राष्ट्रीय स्तर व आंतरराष्ट्रीय स्तरावरप्रावीण्य मिळविलेल्या किंवा काही ठिकाणी तर केवळ सहभागी स्पर्धकांनादेखील सवलतीचे गुण दिले जातात.त्याचबरोबर एनसीसी व स्काऊट च्या ‘बेस्ट कॅडेट’ना देखील सवलतीचे गुण मिळतात शिवाय कलेमध्ये नाट्य, वादन, गायन, नृत्य आदी क्षेत्रांसाठी देखील सवलतीचे गुण दिले जातात. त्यामुळे या विद्यार्थ्यांना अन्य विद्यार्थ्यांपेक्षा अधिक गुण मिळतात तसेच प्रजासत्ताक दिनाच्या राष्ट्रीय शिबिरातील सहभाग व संचलन, राष्ट्रपती पदक, आंतरराष्ट्रीय युथ एक्स्चेंज प्रोग्रॅममध्ये सहभाग आदींसाठी देखील सवलतीचे गुण मिळतात.
सध्या ज्या विभागांमध्ये गुणवत्ता सिद्ध करणाºया विद्यार्थ्यांना ६ वी ते १२ वी पर्यंत ज्या-त्या क्षेत्रांत प्रावीण्य मिळविल्यास गुण मिळतात. त्यामध्ये क्रीडाक्षेत्रात ३ पासून २५ पर्यंत तर कलाक्षेत्रात ३ ते १५ पर्यंत गुण दिले जातात. हे गुण १० वी व १२ वीच्या गुणपत्रकात समाविष्ट होऊन येतात. त्यामुळे टक्केवारी वाढते त्याचा फायदा पुढील शैक्षणिक प्रवेशासाठी होतो. पण अशी सवलत विज्ञान क्षेत्रात यश संपादन करणाºया विद्यार्थ्यांना मिळत नाही. शालेय मुले अगदी उत्साहाने शासकीय, खासगी विज्ञान स्पर्धेमध्ये सहभाग घेतात आणि आपली विशेष गुणवत्ताही सिद्ध करतात. त्यांना एक प्रमाणपत्र आणि पुढील टप्प्यातील स्पर्धेचे तिकीट मिळते पण हा प्रवास स्मृतिचिन्ह व सन्मानपत्रावर जाऊन थांबतो पण जर या सर्व सन्मानासोबत सवलतीचे गुण मिळाले तर विद्यार्थ्यांना त्याचा लाभ मिळेलच शिवाय आगामी काळात चांगले वैज्ञानिक तयार होण्यास मदत होईल.
शालेय विद्यार्थ्यांचे कल्पनाविश्व विस्तृत असते. त्यांच्याकडे भन्नाट कल्पना असतात. त्यांच्या कल्पना शक्तीला न्याय देण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करणे गरजेचे आहे. १० वी व १२ वी च्या विद्यार्थ्यांना विज्ञान प्रदर्शनामध्ये प्रावीण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांनाही सवलतीचे गुण मिळणे आवश्यक आहे.- गोमटेश बेडगे, मुख्याध्यापक, एम. जी. शहा विद्यामंदिर व ज्युनिअर कॉलेज, बाहुबली