कागल :
महाराष्ट्र शासन एसटी महामंडळाचे खासगीकरण करण्याचे प्रयत्न करीत असून याचा एक भाग म्हणून पाचशे एसटी बसेस खासगी व्यक्तीकडून घेऊन चालविण्याचा घाट घातला आहे. हा निर्णय तत्काळ थांबवावा अशी मागणी एसटी कर्मचारी संघटनेने आज ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
खासगी बसेस घेऊन त्या परिवहन महामंडळाच्या यंत्रणेतून चालवल्या गेल्या तर कर्मचारी वर्गावर बेकारीची कुऱ्हाड कोसळले. मुळात चालक, वाहक, कर्मचारी गेली अनेक वर्षे एसटी बचावसाठी कमी पगारावर काम करीत आहेत. या वेळी मंत्री मुश्रीफ यांनी या विषयावर सोमवारी आपण परिवहन मंत्री अनिल परब यांच्याशी बोलू, असे सांगितले. एसटी कामगार संघटनेचे कागल आगार अध्यक्ष संतोष जाधव, सचिव श्रीमंत तोडकर, सुभाष पोवार, वासिम नायकवडी, आनंदा सुतार, सचिन वाईंगडे, नीलेश सुतार, नितीन नाईक आदी पदाधिकारी उपस्थित होते.