कोल्हापूर : राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी शुक्रवारी करवीर निवासिनी श्री अंबाबाईचे सपत्नीक दर्शन घेतले. यावेळी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्यावतीने त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. सकाळी दहा वाजून दहा मिनिटांनी राज्यपाल आणि त्यांच्या पत्नी विनोधा राव यांचे मंदिर परिसरात आगमन झाले. यावेळी त्यांनी आणलेली साडी देवीला परिधान करण्यात आली. श्री अंबाबाईच्या दर्शनानंतर त्यांनी वरच्या मजल्यावर असलेल्या मातृलिंगचे दर्शन घेतले. यानंतर पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी त्यांचा विशेष सन्मान केला.यावेळी जिल्हाधिकारी दौलत देसाई, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख, पोलीस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, देवस्थान समितीच्या सदस्या संगिता खाडे, शिवाजी जाधव, सचिव विजय पोवार, व्यवस्थापक धनाजी जाधव, तहसिलदार सचिन गिरी, सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी अपर्णा मोरे, गटविकास अधिकारी सचिन घाडगे उपस्थित होते.