हुपरी : येथील श्री गणेश सहकारी पाणीपुरवठा संस्थेच्या अत्यंत अटीतटीने झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये सत्ताधारी सदाशिवराव नाईक यांच्या नेतृत्वाखालील श्री गणेश शेतकरी पॅनेलने सर्वच्या सर्व १५ जागा जिंकून संस्थेवरील आपली पकड घट्ट असल्याचे सिद्ध केले. विरोधी श्री गणेश शेतकरी सहकारी परिवर्तन पॅनेलच्या उमेदवारांनी निवडणुकीमध्ये सत्ताधाऱ्यांच्या विरोधात चांगलेच रान पेटवून सत्ताधाऱ्यांना आत्मचिंतन करावयास भाग पाडले आहे. संस्थेची स्थापना सन १९७२ मध्ये झाली असून, हुपरी, तळंदगे, इंगळी गावाचे कार्यक्षेत्र आहे. परिसरातील ही सर्वांत जुनी संस्था असून, लोकसेवक आ. बा. नाईक, बाबूराव घोरपडे, हुपरीभूषण य. रा. नाईक, आदींनी संस्थेची स्थापना केली आहे. संस्थेचे ३५२ सभासद असून, त्यापैकी ३३५ सभासदांनी मतदानाचा हक्क बजावला. संस्थेच्या सत्ताधारी मंडळींनी गेल्या काही वर्षांपासून शेतकऱ्यांना नाहक त्रास देण्यास सुरुवात केल्यामुळे सभासदांमध्ये काही प्रमाणात असंतोष व नाराजी पसरली होती. त्याचे पर्यवसन निवडणूक लागण्यामध्ये झाले. संस्थेच्या ४३ वर्षांच्या कालावधीतील ही पहिलीच निवडणूक होती. सत्ताधारी गटातील धनाढ्य, दिग्गज व प्रतिष्ठित उमेदवारांच्या तुलनेत विरोधी गटाकडे अत्यंत सामान्य शेतकरी उमेदवार उभे होते. तरीसुद्धा निवडणूक अत्यंत अटीतटीची झाली. यामध्ये सत्ताधारी गटाने अत्यंत कमी मताधिक्याने विजय प्राप्त केला. विजयी उमेदवार व त्यांना मिळालेली मते अशी : सदाशिव आप्पासाहेब नाईक (१९०), आण्णासाहेब भाऊसोा भोजे (१७६), मानसिंग हरिभाऊ देसाई (१६६), बाळासाहेब रामचंद्र जाधव (१६६), बाळासाहेब नाभिराज पट्टणकुडे (१७१), धनपाल रामचंद्र फिरगाण (१६४), बाळकृष्ण मारुती माळी (१६६), आण्णासाहेब राघू चौगुले (१६१), कलगोंडा शंकर चौगुले (१६२), शरद जयवंत कोळेकर (१७४), राजेश आनंदा कोरे (१७४), जयपाल श्रीपती गिरीबुवा (१६६), शिलप्रभा आप्पासोा पाटील (१८४), शोभाताई रामचंद्र पाटील (१७४), तर सत्ताधारी गटातील सदाशिव महादेव तेली यांची यापूर्वीच इतर मागासवर्गीय गटातून बिनविरोध निवड झाली आहे. (वार्ताहर)
हुपरीच्या गणेश पाणी संस्थेत सत्ताधाऱ्यांचे वर्चस्व
By admin | Published: May 19, 2015 7:21 PM