कोल्हापूर : सातव्या कोल्हापूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांतर्गत यंदा ज्येष्ठ छायालेखक गोविंद निहलानी यांना कलामहर्षि बाबुराव पेंटर स्मृती पुरस्कार व चित्रपट संकलक अभिजीत देशपांडे यांना चित्रमहर्षि आनंदराव पेंटर स्मृती पुरस्कार देण्यात येणार आहे. कलामहर्षि बाबुराव पेंटर फिल्म सोसायटीचे अध्यक्ष चंद्रकांत जोशी व सचिव दिलीप बापट यांनी सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेत पुरस्कारांची घोषणा केली.लक्ष्मीपुरीतील आयनॉक्स मल्टिप्लेक्स येथे गुरूवारी (दि. ७) सायंकाळी सहा वाजता ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांच्या हस्ते महोत्सवाचे उदघाटन होईल. यावेळी छायालेखक गोविंद निहलानी यांना तर महोत्सवाच्या सांगता समारंभात (दि. १४) सायंकाळी सहा वाजता संकलक अभिजीत देशपांडे यांना पुरस्काराने गौरवण्यात येईल.गोविंद निहलानी यांनी विजय तेंडूलकर यांच्या शांतता कोर्ट चालू आहे या नाटकापासून स्वयंत्र छायाचित्रण व निर्मितीची सुरुवात केली. जुनून या चित्रपटासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार तर अर्धसत्य या चित्रपटाला दिग्दर्शनासाठी राष्ट्रीय व फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. तमस मालिका, पार्टी, आघात, सुवर्ण मयुरा, द्रोहकाल अलिकडेच प्रदर्शित झालेला ती आणि इतर हे त्यांचे प्रमुख चित्रपट. भारतीय चित्रपटसृष्टीतील योगदानाबद्दल त्यांना सहा वेळा राष्ट्रीय, पाच फिल्मफेअर पुरस्कार तसेच पद्मश्री ने गौरवण्यात आले आहे.अभिजीत देशपांडे यांनी वर्तमान या मालिकेपासून आपल्या चित्रपट कारकिर्दीला सुरूवात केली. देऊळ या चित्रपटासाठी त्यांना मिफ्टा पुरस्कार, पुणे ५२ चित्रपटासाठी दादासाहेब फाळके अॅकॅडमी अवॉर्ड मिळाला. त्यांनी गंध, समांतर, एलिझाबेथ एकादशी, न्यूड, बकेट लिस्ट या चित्रपटांचे संकलन केले. आहे. या शिवाय विविध मालिकांसाठी ते काम करत आहेत.महोत्सवांतर्गत रसिकांना देशविदेशातील चित्रपटांचा आस्वाद तसेच मान्यवरांशी संवाद साधण्याची संधी मिळणार आहे. त्यासाठी प्रेक्षक सभासद नोंदणी गायन समाज देवल क्लब खासबाग येथे दुपारी चार ते रात्री आठ या वेळेत सुरू आहे. तसेच आयनॉक्स येथे गुरूवारी सकाळी दहा वाजल्यापासून नोंदणीस सुरूवात होईल. तरी रसिकांनी महोत्सवाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.