ऑनलाइन लोकमत
कोल्हापूर, दि. १६ - कष्टकरी व उपेक्षीतांना न्याय मिळवून देण्यासाठी संघर्ष करणारे नेते कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्यावर सोमवारी सकाळी अज्ञात व्यक्तींनी हल्ला प्राणघातक हल्ला केला आहे. पानसरे यांच्या निवासस्थानाबाहेरच ही घटना घडली असून पानसरे यांच्या पत्नीवरही हल्लेखोरांनी हल्ला केला आहे. या हल्ल्यात पानसरे दाम्पत्त्य गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सध्या कोल्हापूरमधील अँस्टर आधार रुग्णालयात उपचार सुरु असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते.
कोल्हापूरमधील सागरमळा येथे राहणारे कॉम्रेड गोविंद पानसरे हे सोमवारी सकाळी निवास स्थानाबाहेर पडले असता बाईकवरुन दोन हल्लेखोर तिथे आले. या हल्लेखोरांनी पानसरेंवर प्राणघातक हल्ला केला. तसेच पानसरे यांना वाचवण्याचा प्रयत्न करणा-या त्यांच्या पत्नी उमा पानसरेंवरही त्यांनी हल्ला केला. हल्लेखोरांनी पानसरेंवर गोळीबार केल्याचे वृत्त असले तरी या वृत्ताला अद्याप पोलिसांनी दुजोरा दिलेला नाही. या हल्ल्यात पानसरे दाम्पत्त्य गंभीर जखमी झाले आहे. नरेंद्र दाभोलकर यांच्यानंतर आता ज्येष्ठ विचारवंत गोविंद पानसरेंवरही हल्ला झाल्याने पुरोगामी महाराष्ट्राच्या प्रतिमेला धक्का बसल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. या हल्ल्याचा सर्वच राजकीय पक्षांनी निषेध दर्शवला आहे. पानसरेंवरील हल्ला निषेधार्ह असल्याची प्रतिक्रिया राज्याचे सहकारमंत्री आणि कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. तर हल्ल्यानंतर कोल्हापूरमध्ये नाकाबंदी करण्यात आली असून पोलिस हल्लेखोरांचा कसून शोध घेत आहे अशी माहिती राज्याचे गृहराज्यमंत्री राम शिंदे यांनी दिली.