कोल्हापूर : ज्येष्ठ नेते अॅड. गोविंद पानसरे हत्या प्रकरणात प्रथमदर्शी सहभाग असल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने या हत्या प्रकरणातील पाचवा संशयित आरोपी अमोल अरविंद काळे (वय ३४, रा. प्लॉट नंबर ३, अक्षय प्लाझा, माणिक कॉलनी, पिंपरी-चिंचवड, पुणे) याला गुरुवारी कोल्हापूर जिल्हा न्यायालयाने २२ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी दिली.कोल्हापूर एसआयटीने संशयित काळेला १५ वे सह दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) एस. एस. राऊळ यांच्या न्यायालयात सकाळी हजर केले. सुमारे ४५ मिनिटे युक्तिवाद झाला. बुधवारी (दि. १४) बेंगलोर न्यायालयाच्या आदेशानंतर तेथील राजराजेश्वरी पोलिस ठाणे येथून त्याला एसआयटीने ताब्यात घेतले.पुणे येथील डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणी सीबीआयने तर कर्नाटकातील पत्रकार गौरी लंकेश हत्ये प्रकरणी बेंगलोर एसआयटीने अमोल काळेला अटक केली होती. या तपासावेळी काळेकडून पानसरे हत्या प्रकरणात सहभाग असल्याचे प्रथमदर्शी निष्पन्न झाले. त्यामुळे कोल्हापूर एसआयटीने बुधवारी काळेचा बेंगलोर येथून पानसरे हत्येप्रकरणी ताबा घेतला.
गुरुवारी सकाळी कोल्हापूरातील राजारामपुरी पोलिसांनी त्याला सात वाजून २६ मिनिटांनी अटक केली. त्यानंतर छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात (सीपीआर) वैद्यकिय तपासणी त्याची करण्यात आली. याचा तपास अतिरिक्त पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे करीत आहे. त्यांनी सकाळी एस.एस.राऊळ यांच्या न्यायालयात काळेला हजर केले. यावेळी विशेष सरकारी वकील अॅड. शिवाजीराणे यांनी, पानसरे हत्या प्रकरणात अमोल काळेचा सहभाग असल्याचे प्रथमदर्शी तपासात निष्पन्न झाले आहे.
कोल्हापूरात त्याचे यापुर्वी वास्तव्य होते. त्याने कसा कट रचला, त्याचे साथीदार कोण आहेत , त्याने कोल्हापूर परिसरात अग्निशस्त्र चालविण्याचे प्रशिक्षण कोठे घेतले, या अनुषंगाने तपास करायचा आहे. त्यामुळे त्याला १४ दिवसांची पोलिस कोठडी मिळावी, अशी मागणी युक्तिवादावेळी केली.तपास अधिकारी तिरुपती काकडे यांनी, संशयित अमोल काळे याचे नोव्हेंबर / डिसेंबर २०१४ मध्ये कोल्हापूरात वास्तव्य होते, असे तपासात निष्पन्न झाले आहे. पानसरे हत्या प्रकरणातील हत्यार व वाहन जप्त केलेला नाही. त्यामुळे काळेला पोलिस कोठडी मिळावी, असा युक्तिवाद केला.
अमोल काळे याच्यातर्फे अॅड. समीर पटवर्धन, अॅड. स्मिता शिंदे यांनी काम पाहिले. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून एस.एस.राऊळ यांनी, काळेला २२ नोव्हेंबर २०१८ पर्यंत पोलिस कोठडी दिली.
संशयित अमोल काळेला पोलिस वाहनात बसविताना पोलिस अधिकारी व कर्मचारी. (छाया : दीपक जाधव)तपासाबाबत गोपनीयता ; उच्च न्यायालयात अहवालपानसरे हत्या प्रकरणाचा संपूर्ण तपास हा उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली सुरु आहे. कोल्हापूर व बेंगलोर एसआयटी आणि दाभोलकर हत्या प्रकरणाचा तपास करणारी सीबीआय असे तिघे संयुक्तिरित्या या प्रकरणाचा तपास करीत आहेत. त्यामुळे तपासातील बाबी प्रसारमाध्यमांना सांगू नये, असे निर्देश उच्च न्यायालयाने तपासयंत्रणेला दिले आहेत.अमोल काळेबाबत काय तपास केला याचा अहवाल कोल्हापूर एसआयटी २२ नोव्हेंबरला उच्च न्यायालयात सादर करणार असल्याचे अॅड. राणे यांनी यावेळी सांगितले.
पानसरे हत्या प्रकरण असे...सागरमाळ येथे १६ फेब्रुवारी २०१५ ला गोविंद पानसरे यांच्यावर गोळीबार झाला. त्यानंतर २० फेब्रुवारीला त्यांचा खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यु झाला. या हत्येप्रकरणी संशयित समीर विष्णु गायकवाड व डॉ. वीरेंद्रसिंह शरदचंद्र तावडे या दोघांना पोलिसांनी अटक केली. त्यानंतर प्राथमिक तपासात संशयित विनय बाबूराव पवार (रा. उंब्रज, ता. कऱ्हाड ) व सारंग दिलीप अकोलकर (रा. शनिवार पेठ, पुणे) यांचे नांव निष्पन्न झाले. त्यांनाही तीन व चार संशयित आरोपी करण्यात आले.
या प्रकरणात समीर व वीरेंद्रसिंह तावडे या दोघांना जामीन झाला. सध्या समीर हा बाहेर तर तावडे हा डॉ.नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणी सध्या पुणे येथे न्यायालयीन कोठडीत आहे. पवार व अकोलकर यांना कोल्हापूर न्यायालयाने फरारी घोषित केले असल्याचे अॅड.राणे यांनी सांगितले.