कोल्हापूर : ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणातील आठवा संशयित आरोपी अमित देगवेकर याच्याकडे राज्याचे ‘एस.आय.टी.’चे पोलीस महासंचालक संजीवकुमार सिंघल यांनी दोन तास कसून चौकशी केली. तपासाचा आढावा घेण्यासाठी ते कोल्हापूरच्या दौऱ्यावर आले होते. तपासाबाबत गोपनीयता पाळली आहे. सिंघल यांनी प्रसारमाध्यमांशी भेट नाकारली.पानसरे हत्याप्रकरणी अमित देगवेकर याच्याकडून गेल्या आठ दिवसांपासून चौकशी सुरू आहे. तपास पथकाच्या हाती महत्त्वाचे धागेदोरे लागले आहेत. ‘एसआयटी’चे पोलीस महासंचालक सिंघल कोल्हापूर दौऱ्यावर आले.
त्यांनी विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक तिरूपती काकडे यांची बैठक घेऊन पानसरे हत्येच्या आतापर्यंतच्या तपासाची माहिती घेतली. त्यांनी दिवसभरात दोन तास देगवेकर याच्याकडे बंद खोलीत चौकशी केली. ही चौकशी इन कॅमेरा घेण्यात आली. यापूर्वी त्यांनी पाचवा संशयित अमोल काळे याच्याकडे चौकशी केली होती.‘सीआयडी’च्या कामाचा आढावासिंघल यांनी दुपारी शनिवार पेठ येथील राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीआयडी) अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कामकाजाचा आढावा घेतला. प्रलंबित गुन्ह्यांचा निपटारा लवकरात लवकर करण्याचा सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. अधीक्षक डॉ. दिनेश बारी यावेळी उपस्थित होते.