कोल्हापूर : ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे खून खटल्याच्या सुनावणीत आज, मंगळवारी (दि. २०) जिल्हा व सत्र न्यायाधीश (३) एस. एस. तांबे यांच्यासमोर संशयित आरोपी समीर विष्णू गायकवाड (रा. सांगली) याला पंच साक्षीदाराने ओळखले. तसेच गायकवाड याच्या अटकेदरम्यान जप्त केलेले त्याचे दोन मोबाइलही पंच साक्षीदार नितीन मंगेश जाधव (वय ३५, रा. शास्त्रीनगर, कोल्हापूर) यांनी ओळखले.पानसरे खून खटल्यातील संशयिताच्या अटकेचा पंच साक्षीदार नितीन जाधव यांची साक्ष मंगळवारी विशेष सरकारी वकील शिवाजीराव राणे यांनी न्यायाधीशांसमोर नोंदवली. यावेळी साक्षीदार जाधव याने संशयित आरोपी समीर गायकवाड याच्या अटकेच्या पंचनाम्याचा घटनाक्रम सांगितला. तसेच त्यांनी न्यायालयात उपस्थित असलेला संशयित आरोपी समीर गायकवाड याला ओळखले. सुनावणीसाठी सर्व संशयितांना पोलिस बंदोबस्तात हजर केले होते.संशयित आरोपींच्या वतीने ॲड. ए. एस. रुईकर, ॲड. रवींद्र इचलकरंजीकर, ॲड. समीर पटवर्धन, ॲड. प्रवीण करोशी आणि ॲड. डी. एम. लटके यांनी साक्षीदाराची उलट तपासणी घेतली. पोलिसांनी समीरच्या मोबाइलचा लॉक उघडला नाही असे मुद्दे संशयितांच्या वकिलांनी मांडले. तसेच साक्षीदार मुद्दाम काही प्रश्नांची उत्तरे देण्यास टाळाटाळ करीत असल्याचा आक्षेप ॲड. इचलकरंजीकर यांनी नोंदवला. दिवसभरात एकाच साक्षीदाराची साक्ष नोंदवून उलट तपासणी पूर्ण झाली. पुढील सुनावणी तीन जुलैला होणार आहे.
Kolhapur- गोविंद पानसरे खून प्रकरण: पंच साक्षीदाराने संशयित आरोपीला ओळखले, कोर्टात काय झाले..जाणून घ्या
By उद्धव गोडसे | Published: June 20, 2023 6:36 PM