ऑनलाइन लोकमत
कोल्हापूर, दि, 25 - ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येतील संशयित आरोपी समीर विष्णू गायकवाड याने जामीन मिळाल्यानंतर पहिल्या रविवारी पोलीस मुख्यालयातील एसआयटी कार्यालयात हजेरी लावली. सकाळी सव्वा अकराच्या सुमारास तो वकील व नातेवाईकांसोबत आला. यावेळी कार्यालयातील रजिस्टर वहीमध्ये त्याने सही केली. सुमारे अर्धातास थांबून परत सांगलीला रवाना झाला.
जिल्हा सत्र न्यायालयाने दोनवेळा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर तिसºयांदा समीर गायकवाड याचा जामीन मंजूर केला होता. दि. १९ जून रोजी तो कळंबा कारागृहातून बाहेर पडला. त्याला दर रविवारी एसआयटी कार्यालयात हजेरी लावण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. त्यानुसार रविवारी सकाळी तो वकील समीर पटवर्धन, भाऊ सचिन व संदीप गायकवाड यांचेसोबत पोलीस मुख्यालयात आला. येथील तपास अधिकारी सुहेल शर्मा, सहायक पोलीस निरीक्षक रमेश ढाणे, पोलीस उपनिरीक्षक दिपक वाघवे यांना भेटून रजिस्टर वहीमध्ये सही केली. यावेळी तो हजर राहिला असल्याचे लेखी पोलीसांकडून अॅड. पटवर्धन यांनी लिहून घेतले. अर्धातपास थांबून ते परत सांगलीला रवाना झाले. चारचाकी वाहनातून समीर याठिकाणी आला होता. त्याला कोणत्याही प्रकारे पोलीस बंदोबस्त पुरविलेला नाही.