कोल्हापूर : ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे यांच्या खुनानंतर अटक केलेला संशयित आरोपी समीर विष्णू गायकवाड याच्या सांगलीतील घरात छापा टाकून पोलिसांनी ६८ वस्तू जप्त केल्या होत्या. वस्तूंच्या जप्ती वेळच्या पंच साक्षीदारांनी गरुवारी (दि. १७) जिल्हा व सत्र न्यायाधीश (३) एस. एस. तांबे यांच्यासमोर झालेल्या सुनावणीत जप्त वस्तू ओळखल्या. सरकार पक्षामार्फत सरतपास झाल्यानंतर संशयितांच्या वकिलांनी उलट तपासात पंच साक्षीदाराची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. पुढील सुनावणी सात आणि आठ सप्टेंबरला होणार आहे.पानसरे यांच्या खुनानंतर पोलिसांनी संशयित आरोपी समीर गायकवाड याला सांगलीतून अटक केली होती. त्यानंतर सांगली पोलिसांच्या मदतीने कोल्हापूर पोलिसांनी समीर याचा भाऊ सचिन विष्णू गायकवाड यांच्या सांगलीतील शंभर फुटी रोड येथील घरात छापा टाकला. त्यावेळी ६८ वस्तू जप्त केल्या होत्या. त्या वस्तू सुनावणीदरम्यान न्यायालयात हजर करण्यात आल्या. जप्ती वेळच्या पंच साक्षीदारांनी सर्व वस्तू ओळखून त्या समीर गायकवाड याच्या घरातून जप्त केल्याचे न्यायालयात सांगितले. विशेष सरकारी वकील हर्षद निंबाळकर आणि शिवाजीराव राणे यांनी बुधवारी दिवसभर सरतपास घेतला.बचाव पक्षाचे वकील समीर पटवर्धन, अनिल रुईकर, डी. एम. लटके यांनी गुरुवारी पंच साक्षीदाराचा उलट तपास घेतला. काही मुद्द्यांवरून पंच साक्षीदारांची कोंडी करण्याचाही प्रयत्न वकिलांनी केला. संशयित आरोपी समीर गायकवाड न्यायालयात प्रत्यक्ष उपस्थित होता. अन्य तीन संशयित येरवडा तुरुंगातून, तर सहा संशयित बंगळुरू तुरुंगातून व्हीसीद्वारे सुनावणीत सहभागी झाले.
गोविंद पानसरे खून खटला: जप्त वस्तू पंच साक्षीदाराने न्यायालयात ओळखल्या, सुनावणीदरम्यान वकिलांची खडाजंगी
By उद्धव गोडसे | Published: August 17, 2023 6:38 PM