कोल्हापूर : संशयित डॉ. वीरेंद्र तावडे हे ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या कटामागील मुख्य सूत्रधार होते. त्याचे काही पुरावे शुक्रवारी विशेष सरकारी वकील ॲड. हर्षवर्धन निंबाळकर यांनी न्यायालयासमोर सादर केले.मागील सुनावणीत हत्या प्रकरणातील पहिला संशयित समीर गायकवाड याचा दोषमुक्तीचा अर्ज संशयितांच्या वकिलांनी मागे घेतला होता. त्यानंतर डॉ. तावडे व सचिन अंदुरे यांच्यावरील दोषारोप निश्चित करण्याचे काम सध्या न्यायालयात सुरू आहे. यावर शुक्रवारी सरकार पक्षातर्फे बाजू मांडण्यात आली. अतिरिक्त सत्र न्यायाधीश बी.डी. शेळके यांच्या न्यायालयात ही सुनावणी सुरू आहे. यावेळी विशेष सरकारी वकील शिवाजीराव राणे उपस्थित होते. पुढील सुनावणी १३ एप्रिलला होणार आहे.न्यायालयातील युक्तिवादानंतर ॲड. निंबाळकर यांनी माध्यमांना माहिती दिली. ते म्हणाले, तिघांसाठी दोषमुक्तीचा अर्ज न्यायालयात सादर केला होता. त्यापैकी संशयित समीर गायकवाडचा अर्ज मागे घेतला. त्यामुळे आता डाॅ. वीरेंद्र तावडे, सचिन अंदुरे या संशयितांबाबत युक्तिवाद झाला.मी न्यायालयात सांगितले की, हा गुन्हा कटकारस्थानातून झाला आहे. सर्व आरोपींचे मिळून पानसरे यांची हत्या करण्याचे उद्दिष्ट होते.पण वेगवेगळे रोल सर्वांना दिले होते. त्यामुळे जरी खून करताना दोनच आरोपी असले तरीही सगळे आरोपी हे कटात सहभागी असल्यामुळे सर्वांचा रोल हा तेवढाच महत्वाचा असतो. यामध्ये तावडे या कटाच्या मागे मुख्य सूत्रधार होते. वेगवेगळ्या लोकांना तेच असाइनमेंट देत होते. त्या दृष्टीने एसआयटी ने गोळा केलेला पुरावा मी न्यायालयासमोर मांडला.व्हिडिओद्वारे उपस्थितीसंशयितांना व्हिडिओ कॉलिंगद्वारे न्यायालयातील सुनावणीवेळी हजर ठेवण्यात आले. त्यांचे वकील वीरेंद्र इचलकरंजीकर, ॲड. समीर पटवर्धन यांच्यासह पानसरे यांच्या स्नुषा मेघा पानसरे, दिलीप पवार उपस्थित होते.
गोविंद पानसरे हत्या प्रकरण: वीरेंद्र तावडेच हत्या कटाचा मुख्य सूत्रधार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2022 11:49 AM