कोल्हापूर : भाकपचे नेते कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येतील आरोपींना पकडण्यात पोलिसांना अपयश आले आहे. उच्च न्यायालयानेही तपास यंत्रणेवर ताशेरे ओढले आहेत. त्यामुळे तपासाचा आढावा घेण्यासाठी राज्याच्या गृह विभागाचे अप्पर सचिव राजीव जैन यांनी उद्या, मंगळवारी दुपारी मंत्रालयात बैठक आयोजित केली आहे.
‘एस.आय.टी.’च्या अधिकाऱ्यांसह विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनाही बैठकीला पाचारण केले आहे. अप्पर पोलीस अधीक्षक तिरूपती काकडे यांना रविवारी रात्री उशिरा याचा फॅक्स प्राप्त झाला.कॉ. पानसरे यांची हत्या होऊन अडीच वर्षे झाली. पोलिसांनी संशयित दोघांना अटक केली. मात्र त्यांच्याकडून ठोस माहिती अथवा गुन्ह्यात वापरलेले हत्यारही प्राप्त झालेले नाही. या तपासावर उच्च न्यायालयाचे लक्ष आहे.
न्यायालयाने वेळोवेळी तपास यंत्रणेला फटकारले आहे. पुढील तारखेस राज्याच्या अप्पर सचिवांना उपस्थित राहण्याचे आदेश काढले आहेत. त्यामुळे तपास यंत्रणा खडबडून जागी झाली आहे.या तपासाची माहिती घेण्यासाठी राज्याच्या गृह विभागाचे अप्पर सचिव राजीव जैन यांनी उद्या, मंगळवारी दुपारी ३.३० वाजता आपल्या दालनात बैठकीचे आयोजन केले आहे.
या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी ‘एस.आय.टी.’चे प्रमुख संजयकुमार, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक तिरूपती काकडे यांना फॅक्स पाठविण्यात आले आहेत. आजपर्यंतच्या तपासाची माहिती घेऊन हे अधिकारी हजर राहणार आहेत.
कॉ. पानसरे हत्येतील मारेकऱ्यांना शोधण्यासाठी एस. आय. टी. पथकातील कर्मचारी दोन वर्षांपासून भिकारी, फेरीवाले, चहावाले अशा प्रकारचे वेशांतर करून राज्याच्या कानाकोपऱ्यांत तपास करीत आहेत. दोन वर्षांपासून हे कर्मचारी पाळत ठेवून आहेत. मात्र त्यांना संशयितांपर्यंत पोहोचता आलेले नाही, याची सचित्र माहिती या बैठकीत मांडली जाणार आहे.