कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघा (गोकुळ) ने ‘महाराष्ट्र बंद’च्या पार्श्वभूमीवर गुरुवारी सकाळचे दूध संकलन केले नाही. संघाचे सकाळी साडेसहा लाख लिटर दूध संकलन होते. हे सर्व दूध गुरुवारी शेतकऱ्यांच्या घरातच राहिले.
बंद संपल्यावर सायंकाळचे संकलन मात्र संघाने केले. ज्यादिवशी संकलन होत नाही, त्या दिवशीचे दूध बिल दिले जात नाही. त्यामुळे एक वेळचे संकलन बंद राहिल्याने शेतकऱ्यांना सुमारे अडीच कोटींचा फटका बसला.आरक्षणासाठी मराठा समाजाने ‘महाराष्ट्र बंद’ची हाक दिली होती. बंद काळात दूध वाहतूक करणाऱ्या वाहनांची तोडफोड होते व समाजाचा आंदोलनास पाठिंबा म्हणूनही संघाने संकलन बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता.
सुमारे ३५० टेम्पोंमधून हे दूध ‘गोकुळ’कडे येते; परंतु गुरुवारी एकही टेम्पो रस्त्यावर आला नाही. सकाळी घरोघरी भल्या पहाटेपासून सुरू असलेली महिलांची लगबगही काहीशी मंदावली होती. म्हैशीच्या धारा तरी काढाव्याच लागल्या; परंतु त्या दुधाचा कुटुंबातच आस्वाद घेतला.‘गोकुळ’ने एक वेळचे दूध संकलन बंद केल्याने पुणे, मुंबईतील दूध वितरणावर परिणाम होऊ नये म्हणून संघाने बुधवारीच जास्त टँकर पाठविले होते. दिवसात तीन पाळीत प्रत्येकी २० टँकर मुंबईला जातात. गुरुवारी सकाळी व दुपारी टँकर गेलेच नाहीत. रात्री उशिरा टँकर पाठविण्यात आल्याची माहिती संघाच्या सूत्रांनी दिली.