कोल्हापूर : जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी संपावर गेलेल्या महसूलमधील ९११ कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांची सही झाल्यावर आज शुक्रवारी नोटीस बजावण्यात येत असून, ती मिळाल्यापासून ४८ तासांत लेखी खुलासा सादर करा, तसेच संपात सहभागी न होता तत्काळ कर्तव्यावर हजर व्हावे, अन्यथा काम नाही वेतन नाही, या धोरणानुसार कारवाई केली जाईल, असा इशारा त्यात दिला आहे.जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी मंगळवारपासून सरकारी, निमसरकारी कर्मचारी व शिक्षकांनी बेमुदत संप पुकारला आहे. त्यात महसूलमधील १ हजार ९० पैकी ९११ कर्मचारी सहभागी झाले आहेत. यात महसूल सहायक, अव्वल कारकून, तलाठी, मंडल अधिकारी, वाहन चालक, शिपाई यांचा समावेश आहे. संप सुरू होण्यापूर्वीच म्हणजे सोमवारी (दि. १३) जिल्हा प्रशासनाने सर्व कर्मचाऱ्यांना संपावर जाऊ नका, असे आवाहन करून अन्यथा कारवाई केली जाईल, असा इशारा दिला होता. काम नाही वेतन नाही, हे धोरण राज्य शासनाने अंगीकारले असून, त्यात संपात सहभागी शासकीय कर्मचाऱ्यांच्या सेवेत खंड पडू शकतो, याची जाणीव करून देण्यात आली आहे. आपल्यावर शिस्तभंगाची कारवाई का प्रस्तावित करू नये, याचा लेखी खुलासा नोटीस मिळाल्यापासून ४८ तासांत सादर करावा. संपात सहभागी न होता तातडीने कर्तव्यावर हजर व्हावे, अन्यथा काम नाही वेतन नाही, या धोरणानुसार कारवाई केली जाईल, असे नोटिशीत म्हटले आहे.
कर्मचारी संवर्ग : २००५ पूर्वीचे : २००५ नंतरचेमहसूल सहायक : ७ : २२६अव्वल कारकून : ७३ : ९७तलाठी : ७० : ३७८मंडळ अधिकारी : ५९ : १६वाहनचालक : २ : १६शिपाई : ५२ : ५६
कार्यरत कर्मचारी : १ हजार ९०पूर्व परवानगीने रजेवर असलेले कर्मचारी : २२संपातील कर्मचारी : ९११कार्यालयात उपस्थित कर्मचारी : १५७