कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने विद्यापीठाने तृतीय, द्वितीय वर्षाबरोबरच प्रथम वर्षाची परीक्षा ऑनलाईन घेण्याचा निर्णय घेतला. त्यातील पदवी प्रथम वर्षाची परीक्षा घेण्याची जबाबदारी महाविद्यालयांवर सोपविण्यात आली. त्यानुसार गेल्या दोन आठवड्यांत महाविद्यालयांनी परीक्षा घेण्याची तयारी केली. ज्या महाविद्यालयांमध्ये कला, वाणिज्य, विज्ञान विद्याशाखांचे अभ्यासक्रम आहेत त्यांनी सोमवारपासून, तर एक-दोन विद्याशाखांचे अभ्यासक्रम असणाऱ्या महाविद्यालयांनी बुधवार (दि. ५ मे)पासून परीक्षा घेण्याचे नियोजन केले आहे. त्याबाबतच्या वेळापत्रकाची माहिती महाविद्यालय प्रशासनाकडून विद्यार्थ्यांना देण्यात आली आहे. दरम्यान, विद्यापीठाने पदवी, पदव्युत्तर विविध २७ अभ्यासक्रमांच्या हिवाळी सत्रातील परीक्षा शुक्रवारी घेतली. त्यासाठी एकूण २८९६५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी २८१०७ विद्यार्थ्यांनी ऑनलाईन परीक्षा दिली, तर ८५८ विद्यार्थी अनुपस्थित राहिले.
प्रतिक्रिया
विद्यापीठाने केलेल्या सूचनेनुसार महाविद्यालयांनी पदवी प्रथम वर्षाची ऑनलाईन परीक्षा घेण्याची तयारी पूर्ण केली आहे. विद्यापीठ कार्यक्षेत्रातील बहुतांश महाविद्यालयांच्या परीक्षा सोमवारपासून सुरू होतील. दि. १५ मे पर्यंत या परीक्षा पूर्ण करण्याचे नियोजन महाविद्यालयांनी केले आहे.
-डॉ. व्ही. एम. पाटील, सचिव, शिवाजी विद्यापीठ प्राचार्य संघटना.
चौकट
या विद्यार्थ्यांसाठी ‘हेल्पलाईन’ असावी
विद्यापीठाने हिवाळी सत्रातील ऑनलाईन परीक्षेत विद्यार्थ्यांना काही तांत्रिक अडचण निर्माण झाल्यास त्याबाबतच्या मदतीसाठी हेल्पलाईन आणि वॉररूम सुरू केली आहे. पदवी प्रथम वर्षाच्या परीक्षेसाठीदेखील हेल्पलाईन सुरू करावी, अशी मागणी या अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांकडून होत आहे.
आकडेवारी दृष्टिक्षेपात
संलग्नित महाविद्यालये : २७६
प्रथम वर्ष विद्यार्थी संख्या : ६२८००