कोल्हापूर : शहरातील वाहतुकीची व्यवस्था सुधारण्याकरिता लक्ष्मीपुरीतील धान्य बाजार मार्केट यार्ड येथे स्थलांतर करणे आणि शहरात माल उतरविणे व भरण्याला सकाळी १० ते रात्री आठ वाजेपर्यंत बंदी घालणे हे दोनच प्रमुख पर्याय असल्याचे पोलिसांनी बुधवारी महापालिकेतील बैठकीत सांगितले.
महापालिकेच्या छत्रपती ताराराणी सभागृहात धान्य असोसिएशन, व्यापारी महासंघ असोसिएशन, ग्रेन मर्चंटस असोसिएशन यांच्या पदाधिकाऱ्यांसमवेत शहरातील वाहतुकीची कोंडी कमी करण्यासाठी करावयाच्या उपाययोजनेबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीच्या अध्यक्षस्थानी प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे होत्या.
वाहतुकीची समस्या सोडविण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन प्रशासक बलकवडे यांनी केले. विविध व्यापारी असोसिएशन यांच्याशी टप्प्या-टप्प्याने चर्चा करून वाहतुकीची कोंडी कमी करण्यासाठी प्रयत्न करू, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
शहरात टेम्पो व लहान वाहने मोठ्या प्रमाणात माल घेण्यासाठी लक्ष्मीपुरीत येतात. सदरची वाहने येथे जास्त वेळ थांबून राहतात. त्यामुळे वाहतुकीला मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होत आहे. त्या वाहनांना लोडिंग व अनलोडिंगची वेळ देणे आवश्यक असल्याचे शहर वाहतूक पोलीस निरीक्षक स्नेहा गिरी यांनी सांगितले.
लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक अनिल गुजर यांनी लक्ष्मीपुरीतील धान्य बाजार मार्केट यार्डात स्थलांतरित करणे आणि अवजड वाहनांसह सर्व प्रकारच्या वाहनांतील माल उतरविणे व भरण्यास सकाळी दहा ते रात्री आठ वाजेपर्यंत बंदी घालणे आवश्यक असल्याचे सांगितले. त्यास व्यापारी महासंघाचे सदानंद कोरगांवकर यांनी हरकत घेत लक्ष्मीपुरी मार्केट स्थलांतर व वाहतूक समस्या हे दोन वेगवेगळे विषय असल्याचे सांगितले. ग्रेन मर्चंटचे वैभव सावर्डेकर यांनी मार्केट यार्डातील जागा सुरक्षित व सोयीची नसल्याचे सांगितले.
बाजार समितीचे सूर्यकांत पाटील यांनी टेंबलाईवाडी येथे व्यापाऱ्यांसाठी २१३ प्लॉट दिले असून तेथे सुरक्षा रक्षक ठेवण्यात आल्याचे सांगितले. बाजार समितीमार्फत वीज, पाणी व इतर सुविधा पुरविण्यात आलेल्या आहेत. व्यापाऱ्यांना इतर काही सुविधा पाहिजे असतील तर त्यांनी कळविल्यास त्याही देण्याची व्यवस्था करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, पोलीस उपनिरीक्षक मधुकर चौगुले, उपशहर अभियंता रावसाहेब चव्हाण, धान्य मार्केट निरीक्षक सुनील माताडे यांच्यासह व्यापारी उपस्थित होते.