गगनबावडा : अन्नसुरक्षा अभियानांतर्गत मिळणाऱ्या धान्याचा दर एक ते दोन रुपये प्रती किलो, तर धान्य दळपाचा दर मात्र पाच ते दहा रुपये किलो, अशी विपरीत परिस्थिती या योजनेच्या लाभार्थ्यांवर येत आहे. ज्या उद्दात हेतूने ही योजना राबविण्यात येत आहे, तो उद्दात हेतूच मागे पडत असल्याचे लाभार्थ्यांचे मत आहे.सरकारने समाजातील उपेक्षित घटक, दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांसाठी अनेक योजना यापूर्वीही राबविल्या आहेत. याशिवाय सध्या सुरू असलेली अन्नसुरक्षा अभियानासारखी महत्त्वाकांक्षी योजना राबत असून, या योजनेंतर्गत प्राप्त होणारे अन्नधान्य एकदम स्वस्त मिळत आहे. मात्र, दळण्याचा खर्च चौपट ते पाचपट असल्याने लाभार्थ्यांमधून नाराजी आहे.गरीब तसेच उपेक्षित घटकांतील लोकांना धान्यापेक्षा दळपाचा जादा दर न परवडणारा आहे. यासाठी शासनाने काहीतरी पर्याय शोधणे तसेच तोडगा काढणे गरजेचे आहे. इंधनाचे वाढलेले दर, विजेचे औद्योगिक क्षेत्रासाठी वाढलेले दर पाहता दळपकांडप गिरणी मालक सध्या ज्या दरात दळप कांडप करतात, त्यापेक्षा कमी दरात दळप कांडप करू शकतील ही अपेक्षा बाळगणे चुकीचे आहे. यासाठी लाभार्थ्यांना शासनाने अनुदान स्वरूपात आर्थिक मदत केल्यास हा प्रश्न निकालात निघेल. (प्रतिनिधी)
धान्य दोन रुपयांचे; दळप खर्च पाच रुपये
By admin | Published: May 19, 2015 9:36 PM