आॅनलाईन लोकमत
कोल्हापूर, दि. १६ : अन्न सुरक्षा योजनेंतर्गत असलेल्या लाभार्थ्यांपैकी ज्यांच्या शिधापत्रिकेवर त्यांच्या कुटुंबातील एकाही सदस्याचा आधार क्रमांक संलग्नित झालेला नाही, अशा शिधापत्रिकेवरील धान्याचे वितरण १ जूनपासून बंद केले जाणार आहे. याबाबत तहसीलदारांना सूचना दिल्या आहेत, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी विवेक आगवणे यांनी मंगळवारी येथे पत्रकार परिषदेत दिली.
रेशन दुकानदारांसह क्षेत्रिय पातळीवरील पुरवठा यंत्रणेतील सर्व घटकांची सभा राजर्षी शाहू स्मारक भवनात झाली. त्यानंतर जिल्हा पुरवठा अधिकारी आगवणे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, अन्न सुरक्षा योजनेतील शिधापत्रिकाधारक व त्यांच्या कुटुंबांतील अन्य सदस्यांचे आधार संलग्नीकरण केले जात आहे. त्यात कुटुंबातील एक-दोन सदस्यांचे आधार संलग्नीकरण नसल्यास, आधारची ओळख पटवून देण्यात काही तांत्रिक अडचण उद्भवल्यास सध्या तरी अशा लाभार्थ्यांना धान्य दिले जात आहे. मात्र, आधार संलग्नीकरण बंधनकारक असून ते सर्व लाभार्थ्यांनी लवकरात लवकर ते करून घ्यावे.
कोल्हापूर जिल्ह्यातील रेशन दुकानांमध्ये ‘ईपोओएस’ (ई-पाँईट आॅफ सेल मशीन) वर लाभार्थीने पहिल्यांदा थंब केल्याने त्यांना वितरीत केल्या जाणाऱ्या धान्याची पावती मिळते. या ईपीओएसच्या प्रणालीत सुधारणा केली जात आहे. त्यात दुसरा थंब केल्यानंतर त्याला वितरीत केल्या जाणाऱ्या धान्याचे होणारे पैसे लाभार्थ्याच्या बँक खात्यातून दुकानदाराच्या खात्यात वर्ग होतील. ही प्रणाली लवकरच विकसित केली जाईल. वृद्ध लाथार्थ्यांनी थंब केल्यानंतर ते नीट होत नसल्याचे निदर्शनास येत आहे. ही अडचण दूर करण्यासाठी वृद्धांच्या हाताच्या सर्व बोटांचे थंब इम्प्रेशन होण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. ‘ईपीओएस’ वापरामध्ये राज्यात आघाडीवर जिल्ह्यात अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत साडेपाच लाख शिधापत्रिकाधारक आहेत. त्यातील दोन लाख शिधापत्रिकांचे ‘ईपीओएस’द्वारे धान्य वितरण केले आहे. त्यातील प्रत्येक व्यवहार ‘ईपीडीएस’ (ई-सार्वजनिक वितरण प्रणाली) या संगणक प्रणालीच्या माध्यमातून होत आहे.
‘ईपीओएस’ वापरात कोल्हापूर राज्यात आघाडीवर असल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी आगवणे यांनी सांगितले. ते म्हणाले, जिल्ह्यात १५७१ रेशन दुकाने असून त्यापैकी १५६७ दुकानांमध्ये ‘ईपीओएस’ कार्यान्वित आहेत. याद्वारे दि. १ ते १६ मेदरम्यान २ लाख ५५ हजार झाले असून ६३ लाख किलो धान्याचे वितरण केले आहे. त्यात गहू, तांदूळ, साखर आदींचा समावेश आहे. या कालावधीत राज्यात एकूण ५ लाख ९६ हजार व्यवहार झाले आहेत.
‘ग्रास’ प्रणालीअंतर्गत जिल्ह्यातील रेशन दुकानदारांचा भरणा शंभर टक्के आॅनलाईन होत आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात शनिवारी कार्यशाळा ‘ईपीओएस’च्या वापरात कोल्हापूरने राबविलेली कार्यपद्धती, प्रणालीबाबत कोल्हापूर विभागातील अन्य जिल्ह्यांतील पुरवठा विभागांना मार्गदर्शन करण्यासाठी शनिवारी (दि. २०) सकाळी अकरा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यशाळा होणार आहे. यासाठी सांगली, सातारा, सोलापूर आणि पुणे जिल्ह्यांतील पुरवठा अधिकारी, अन्नधान्य वितरण अधिकारी, तांत्रिक आधिकारी उपस्थित असतील, असे जिल्हा पुरवठा अधिकारी आगवणे यांनी सांगितले.