कोल्हापूर : राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या जिल्ह्यात राज्यस्तरीय बेमुदत आंदोलन करण्याचा निर्णय ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी घेतला आहे. १ जानेवारीपासून बिंदू चौकात राज्यातील सर्व कर्मचारी बेमुदत आंदोलनास सुरुवात करणार आहेत. नवी दिल्लीतील किसान आंदोलनाच्या धर्तीवर एकत्रितपणे हे आंदोलन होणार आहे.
वेतनासह अन्य मागण्यांवरून अर्थ आणि ग्रामविकास मंत्रालयात सुरू असलेल्या चालढकलीमुळे ग्रामपंचायत कर्मचारी वैतागले आहेत. आताही त्यांचे आंदोलन सुरूच आहे; पण अजूनही शासन गांभीर्याने घेत नसल्याने हे आंदोलन नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवसापासून तीव्र करण्याचा निर्णय बुधवारी कोल्हापुरात झालेल्या राज्य ग्रामपंचायत युनियनच्या बैठकीत घेण्यात आला. राज्याध्यक्ष तानाजी ठोंबरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस ए. बी. कुलकर्णी, नामदेव चव्हाण, नामदेव गावडे, दिलीप पवार, शिवाजी पाटील, रघुनाथ कांबळे यांची उपस्थिती होती.
अभय यावलकर समितीच्या शिफारशीनुसार वेतनश्रेणी निश्चित करा, किमान वेतनाच्या फरकासह थकबाकी द्या, राहणीमान भत्ता शासनाकडून द्यावा, ग्रॅच्यूएटीसाठीच्या जाचक अटी रद्द कराव्यात, म्हैसेकर समितीच्या शिफारशीनुसार पेन्शन द्या, कायमस्वरूपी विमा योजना लागू करा, कोरोनाकाळात मृत्यू झालेल्यांच्या वारसांना ५० लाखांचे अर्थसाहाय्य द्या, या मागण्यांसाठी हे आंदोलन होणार आहे.