लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : करवीर, पन्हाळ्यासह पाच तालुक्यांतील सरपंच, उपसरपंच निवडी गुरुवारी (दि.२५) होत आहेत. सदस्यांची फोडाफोडींना वेग आल्याने आपापल्या सदस्यांना सहलीवर पाठविले जात आहे. कोकण, गोव्याच्या समुद्राची सवारी बरोबरच महाबळेश्वराची थंड हवा व स्ट्राबेरीचा आस्वाद सदस्य घेत आहेत.
जिल्ह्यतील ४३३ ग्रामपंचायतीची निवडणूक प्रक्रिया झाली. मात्र, सरपंच आरक्षणावर हरकती घेतल्याने करवीर, पन्हाळा, गडहिंग्लज, शिरोळ, शाहूवाडी व भुदरगड तालुक्यांतील सरपंच निवडींना स्थगित मिळाली. उर्वरित तालुक्यातील निवडी ९ फेब्रुवारीला झाल्या असून, या तालुक्यातील निवडी गुरुवारी होत आहेत. करवीर, पन्हाळा, गडहिंग्लज, शिरोळ, शाहूवाडी तालुके हे मंत्री व वजनदार आमदारांचे असल्याने सदस्य फोडाफोडीचे राजकारण उफाळले आहे. प्रत्येक गावात साम, दाम, दंड सर्व नीतीचा वापर सुरू आहे. नोकरी, सरपंच, उपसरपंच, विकास संस्थांचे अध्यक्ष पद, बाजार समितीची उमेदवारी, आदी आमिषे दाखवून फोडाफोडी सुरू आहे. आपले सदस्य विरोधकांच्या हाताला लागू नयेत, यासाठी त्यांना सहलीवर पाठविले आहे. काहींनी देवदर्शनास पसंती दिली, तर काहींनी थंड हवेचे महाबळेश्वर व दमट हवामानाचा कोकण, गोव्यास पसंती दिली आहे. त्यात कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्याने कोकण, गोव्याला अधिक सदस्यांना पाठविले आहे. समुद्र किनाऱ्यावरील दमट हवेबरोबरच बोटिंगचा आस्वाद सदस्य घेत आहेत. बुधवारी सकाळी ते परतीच्या मार्गावर लागणार असून, सायंकाळी कोल्हापूर शेजारी थांबून गुरुवारी निवडीसाठी थेट सभागृहातच आणले जाणार आहेत.
नेत्यांची गोची
स्थानिक पातळीवर सोयीनुसार आघाड्या झाल्या आहेत. सरपंच पदाच्या बेरजेसाठी कमी पडत असेल तर नेत्यांच्या माध्यमातून दबाव टाकला जात आहे. मात्र, ‘साहेब यात लक्ष घालू नका’ असे नेत्यांनाही सांगितले जात असल्याने त्यांची गोची झाली आहे.
बडदास्त पुरवताना दमछाक
निकाल लागल्यापासून सदस्यांना खूष ठेवण्यासाठी रोज जेवणावळी सुरू आहेत. सहलीवर गेल्यानंतर चमचमीत जेवणाबरोबरच इतर मागण्याही पुरवाव्या लागत आहेत. महिला सदस्यांचे पतीही सोबत असल्याने दुप्पट खर्च होत आहे. सदस्यांची बडदास्त पुरविताना स्थानिक नेत्यांसह सरपंच पदासाठी इच्छुकांची दमछाक झाली आहे.