लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच व सदस्यांना ग्रामविकासाविषयक विविध बाबींच्या अनुषंगाने प्रशिक्षण देण्यात येणार असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. सदस्यांची संख्या विचारात घेऊन पहिल्या टप्यात ७७ हजार ५०० जणांना प्रशिक्षण दिले जाणार आहे.
यशदा, पंचायतराज प्रशिक्षण केंद्रे व पंचायत समित्यांचे गटविकास अधिकारी यांच्या माध्यमातून राज्यात विविध भागात ही प्रशिक्षणे घेण्यात येतील. ग्रामपंचायत विकास आराखड्याच्या माध्यमातून गावाची स्वयंपूर्णतेकडे वाटचाल सुरू असून, नेतृत्व करणारे सरपंच, उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य हेही तितकेच सक्षम होणे गरजेचे आहे. यासाठी राष्ट्रीय ग्रामस्वराज अभियानांतर्गत विशेष निवासी प्रशिक्षण घेण्याचे ठरविले आहे. हे प्रशिक्षण यशदामधील राज्य ग्रामीण विकास संस्थेमार्फत राज्यातील विविध भागात घेण्यात येईल. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमान्वये सरपंचांची जबाबदारी व कर्तव्ये, ग्रामपंचायतीचे कामकाज, ग्रामपंचायत लेखासंहिता, ई-पंचायत, जलसाक्षरता, वेळेचे व्यवस्थापन, शाश्वत विकासासाठी गावसंस्था नियंत्रण, शासनाची ध्येयधोरणे, ग्रामविकासाच्या विविध योजना, आदी विषयांचा समावेश प्रशिक्षणात असल्याचे मंत्री मुश्रीफ यांनी पत्रकात म्हटले आहे.