मुरगूड : बोळावी, चिमगाव, हळदवडे, करंजीवणे, सुरूपली, यमगे, शिंदेवाडी, कुरणी, मळगे, आदी गावांतील गॅस्ट्रोचे शेकडो रुग्ण रुग्णालयात दाखल असताना कागल तालुक्यात अशी कोणतीच साथ पसरली नसल्याचा निर्वाळा देणाऱ्या तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांची शिवसेना जिल्हाध्यक्ष विजय देवणे यांनी झाडाझडती केली. आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करीत असून, या साथीला सर्वस्वी त्या-त्या गावांतील ग्रामपंचायतीच जबाबदार असल्याचा दावा वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केला. वरील गावांमध्ये दोन दिवसांत साथ आटोक्यात न आल्यास शिवसेना उग्र आंदोलन करेल, असा इशाराही देवणे यांनी दिला.मुरगूड परिसरातील दहा ते पंधरा गावांत गेल्या महिन्यापासून गॅस्ट्रोसदृश साथीने थैमान घातले आहे. याबाबत ‘लोकमत’ने सडेतोड लेखन केले आहे. हळदवडे, शिंदेवाडी, यमगे, बोळावी या गावांमध्ये तर रुग्णांची संख्या प्रचंड होती. परिसरातील सर्वच गावांतील पिण्याचे पाणी एकाचवेळी कसे काय दूषित होईल, या बाधित गावांना वेगवेगळ्या ठिकाणांहून पाणीपुरवठा होत होता, तरीही गॅस्ट्रोची साथ कशी पसरली, याबाबत वैद्यकीय अधिकाऱ्यांनी खुलासा करण्याची मागणीही ‘लोकमत’मधून केली होती; पण कागल तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अजित गवळी यांनी कोणतीच साथ नसल्याचा खुलासा केला होता. याबाबतचे वृत्तही प्रसिद्ध झाले होते. या पार्श्वभूमीवर शिवसेना पदाधिकाऱ्यांनी मुरगूडच्या ग्रामीण रुग्णालयाला भेट दिली.यावेळी निवेदनाद्वारे देवणे यांनी बाधित गावांतील पिण्याचे पाणी प्रदूषण नियंत्रण मंडळ व कागल पंचायत समिती आरोग्य विभागाकडून तपासणी करून अहवाल प्रसिद्ध करावा, या गावांत आरोग्य विभागाची पथके पाठवावीत, तालुक्यातील सर्वच गावांत खबरदारीचे उपाय योजावेत, पुरेसा वैद्यकीय साहित्याचा साठा व कर्मचारी उपलब्ध करावेत, अशा मागण्या केल्या आहेत. दोन दिवसांत कार्यवाही झाली नाही, तर शिवसेना आंदोलन करेल, असा इशाराही दिला आहे.दरम्यान, यावेळी कागल तालुका वैद्यकीय अधिकारी अजितकुमार गवंडी यांनी आम्ही वरील सर्व गावांना स्वच्छ पाणीपुरवठा होण्याबाबत वारंवार पत्रव्यवहार केला आहे. तरीही लिकेज, व्हॉल्व्ह गळती, आदी कारणांमुळे लोकांना दूषित पाणी मिळत आहे. त्यामुळेच अशी साथ पसरली असून, या साथीला ग्रामपंचायत प्रशासनच जबाबदार असल्याचे सांगितले.यावेळी शिवसेनेचे तालुका अध्यक्ष अशोकराव पाटील, वैद्यकीय अधीक्षक डॉ. एस. बी. थोरात, डॉ. भारती, धनंजय यादव, दिग्विजय पाटील, सुहास पाटील, मधुकर टेंबुगडे, हरिराम सुतार, किरण पाटील, शहाजी खतकर, दिलीप तिप्पे, चंदर पाटील, रघुनाथ पाटील, यशवंत पाटील तसेच शिवसैनिक उपस्थित होते. (प्रतिनिधी)
गॅस्ट्रोच्या साथीला ग्रामपंचायतीच जबाबदार
By admin | Published: November 19, 2014 12:12 AM