लोकमत न्यूज नेटवर्क
रूकडी माणगाव : माणगाव (ता. हातकणंगले) येथे जर एखाद्या कोविड रुग्णाचा मृत्यू झाल्यास त्याच्यावर ग्रामपंचायतीच्या वतीने अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत या निर्णयासह विविध ठराव करण्यात आले.
कोरोना मुक्त प्रभागासाठी प्रभागातील कोरोना रुग्णांची संख्या शून्य करणे, ६० वर्षांपुढील नागरिकांचे लसीकरणासह ४५ ते ६० वर्षांपर्यंतचे लसीकरण प्रभाग सदस्य यांनी करून घ्यावे. घरोघरी आशासेविका, अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या मदतीने ऑक्सिमीटर व थर्मल गणसह सर्वेक्षण तसेच अॅंटिजन तपासणी, रुग्णांना केअर सेंटरमध्ये दाखल करण्यापासून रुग्ण बरा होईपर्यंत त्याची काळजी व प्रभागात औषधे फवारणी, कोरोना रुग्णाचे घर सॅनिटायझर करणार सदस्यांस बक्षीस म्हणून प्रथम क्रमाकांचे दोन लाख, द्वितीय क्रमांक दीडलाख व तृतीय क्रमांकास एक लाख रुपयांचे ज्यादा निधी विकासकामासाठी व सदस्यास जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी व उपमुख्य कार्यकारी अधिकारी सह गटविकास अधिकारी याच्या स्वाक्षरीने प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
आशा स्वयंसेविका, अर्धवेळ स्त्री परिचर, आशा गटप्रवर्तक, अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना प्रोत्साहन भत्ता मार्च २०२१ पासून ते त्यांचे सर्वेक्षणचे काम संपेपर्यंत प्रतिमहिना १ हजार रुपये मानधन व भेटवस्तू देण्यात येणार असल्याची माहिती सरपंच राजू मगदूम, उपसरपंच अख्तर भालदार, ग्रामविकास आधिकारी बी. बी. राठोड यांनी दिली.