हुपरी : पंचतारांकित औद्योगिक वसाहतीतील ‘महावितरण’च्या कार्यालयाकडून तळंदगे (ता. हातकणंगले) ग्रामपंचायतीची सुमारे १ कोटी २४ लाख रुपये थकबाकीच्या वसुलीसाठी बुधवारी वितरण कार्यालयास सील ठोकण्यात आले. जिल्हा परिषदेचे सदस्य राहुल आवाडे यांनी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन ४४० केव्ही क्षमतेचे कार्यालय सील केले. यावेळी ‘महावितरण’चे अधिकारी आणि ग्रामपंचायत पदाधिकाºयांमध्ये वादावादी झाल्याने घटनास्थळी तणाव निर्माण झाला होता. दरम्यान, याप्रश्नी निर्णय घेण्यासाठी शनिवारी (दि. ४) पंचायत समिती कार्यालयात बैठक आयोजित करण्याचे आश्वासन गटविकास अधिकारी अरविंद धरणगुत्तीकर यांनी दिल्यानंतर कार्यालयाचे सील काढण्यात आले.
महावितरण कंपनीकडून तळंदगे ग्रामपंचायतीची गेल्या सात-आठ वर्षांपासूनची महसुलाची सुमारे १ कोटी २४ लाख रुपयांची थकबाकी आहे. ही थकबाकीची रक्कम वारंवार मागणी करूनही ‘महावितरण’कडून अदा करण्याबाबत टाळाटाळ केली जात आहे. याबाबत राहुल आवाडे म्हणाले, शंभर-दोनशे रुपयांच्या नाममात्र वीज बिलासाठी सर्वसामान्य शेतकरी गोरगरीब कुटुंबे यांची वीज कनेक्शन तोडणाºया महावितरण कंपनीने ग्रामपंचायतीची देणे असलेली १ कोटी २४ लाख रुपयांचा महसूल माफ होण्यासाठी गटविकास अधिकारी यांच्याकडे याचिका दाखल केली होती. त्यांची याचिका फेटाळून लावली आहे. थकबाकीची संपूर्ण रक्कम वसूल होईपर्यंत आपण याप्रश्नी वेळोवेळी निश्चितपणे आवाज उठविणार आहोत. यावेळी जवाहर बँकेचे संचालक सनतकुमार भोजकर, सरपंच जयश्री भोजकर, उपसरपंच रंगराव धनगर, सदस्य मोहसीन नायकवडी, रघुनाथ कोळेकर, पोपट शिंगाडी, रूपाली कांबळे, जयश्री शिरोळे, आदी उपस्थित होते.पंचतारांकित औद्योगिक वसाहतीतील महावितरणच्या कार्यालयाकडील थकबाकी वसुलीसाठी जिल्हा परिषदेचे सदस्य राहुल आवाडे यांनी कार्यालय सील केले. यावेळी ग्रामपंचायत पदाधिकारीही उपस्थित होते.