कोल्हापूर : ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकारी ही पदे रद्द करून पंचायत विकास अधिकारी हे एकच पद निर्माण करण्याची मागणी ग्रामसेवक संघटनेकडून होत होती. या अनुषंगाने एक तज्ज्ञ समितीची नियुक्ती केल्याची माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी पत्रकातून दिली.
नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयाचे उपायुक्त (अस्थापना) यांच्या अध्यक्षतेखालील समितीत नाशिक जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य), उपमुख्य वित्त व लेखा अधिकारी, जळगाव जिल्हा परिषदेचे मुख्य वित्त व लेखा अधिकारी, ग्रामसेवक संघटनेचे एकनाथ ढाकणे यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचबरोबर नाशिक जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) यांची सदस्य सचिवपदी नियुक्त करण्यात आली आहे.ही समिती संबंधित पद निर्माण करण्याची आवश्यकता व त्याची कारणमीमांसा जाणून घेतील. त्याचबरोबर ग्रामविकास अधिकारी व ग्रामसेवक यांची स्वतंत्र वेतनश्रेणी असल्याने एकच पद निर्माण केल्यास अनुज्ञेय वेतन श्रेणीचा अभ्यास करतील. त्याचबरोबर वेतन, वेतनश्रेणी, कालबद्ध पदोन्नती, वित्तीय परिगणना आणि तद्षुंगिक बाबींचा अभ्यास करून शासनाला सहा महिन्यांच्या मुदतीमध्ये अहवाल सादर करणार आहेत.