कोल्हापूर : शासकीय, निमशासकीय, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन मिळावी, अशी काँग्रेसची भूमिका आहे. याचे वकीलपत्र मी घेतो. येत्या अधिवेशनात महाविकास आघाडीतील सर्व पक्षांनी या मागणीला पाठिंबा द्यावा, यासाठी प्रयत्न करतो. जुन्या पेन्शनसाठीच्या लढयाची सुरुवात राजर्षी शाहू महाराज यांच्या भूमीतून होण्यासाठी ४ मार्चला गांधी मैदानापासून भव्य मोर्चा काढू. जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत निघणाऱ्या मोर्चात प्रचंड संख्येने कर्मचारी, शिक्षकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन माजी पालकमंत्री आमदार सतेज पाटील यांनी बुधवारी केले.जुुन्या पेन्शनप्रश्नी येथील अजिंक्यतारा येथे आयोजित शासकीय, निमशासकीय कर्मचारी संघटना, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी संघटनेच्या पदाधिकारी बैठकीत ते बोलत होते. शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांची प्रमुख उपस्थिती होती.आमदार पाटील म्हणाले, राज्य सरकारनेही जुनी पेन्शन लागू करण्याचा निर्णय घ्यावा. यासाठी आता समिती स्थापन करून अभ्यास करण्याची गरज नाही. निर्णय घेण्याची वेळ आली आहे. या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी १४ मार्चला राज्यातील शासकीय, निमशासकीय कर्मचारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी बेमुदत संपावर जाणार आहेत. याला कॉग्रेसचाही पाठिंबा राहील. त्याआधी ४ मार्चला शहरातून भव्य मोर्चा काढून शासनाचे लक्ष वेधू. यामुळे राज्य सरकार येत्या अधिवेशनात काही तरतूद होईल.आमदार आसगावकर म्हणाले, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जुनी पेन्शन दिली; तर राज्य दिवाळखोरीत निघेल, असे सांगून जबाबदारी झटकली आहे.यावेळी सरकारी, निमसरकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी संघटना समन्वय समितीचे निमंत्रक अनिल लवेकर, अतुल दिघे, एस. डी. लाड, दादा लाड, खंडेराव जगदाळे, दत्ता पाटील, सी. एम. गायकवाड, रघुनाथ धमकले, राजाराम वरुटे, पूनम पाटील, वैभव पोवार यांची भाषणे झाली. यावेळी विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
गुजरातला वेगळा न्यायकेंद्र सरकार गुजरातला जाणाऱ्या उद्योगांना, काॅर्पोरेट कंपन्यांना प्रोत्साहन देत आहे. विशेष निधी देत आहे. यामुळे महाराष्ट्रातील कंपन्या तिकडे जात आहेत. परिणामी राज्याचे उत्पन्नाचे स्रोत कमी होत आहे. सरकार कोणाचेही असेल तरी याचाही विचार संघटनांनी गांभीर्याने करण्याची वेळ आल्याचे आमदार पाटील यांनी स्पष्ट केले.एकच मिशनच्या टोप्या‘एकच मिशन, जुनी पेन्शन’ असा आशय लिहिलेली टोपी आमदार पाटील यांच्यासह बैठकीत सहभागी झालेल्या अनेक पदाधिकाऱ्यांनी घातल्या होत्या.