बाजीराव जठार वाघापूर : महाराष्ट्र-कर्नाटकासह,आंध्र प्रदेश, गोवा आदी राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या संत सद्गुरू बाळूमामांच्या भंडारा यात्रेसाठी हजारो भाविकांच्या उपस्थित बाळूमामांच्या रथोत्सवाचे आगमन झाले. बाळूमामांच्या १९ बग्ग्यातून (बकर्यांचे कळप) महाप्रसादाकरिता आणलेल्या मेंढ्यांच्या दुधाच्या घागरी एकत्रित करून बाळूमामांच्या रथातून विधीपूर्वक आदमापूरकडे नेण्याचा कार्यक्रम धार्मिक व भक्तीमय वातावरणात पार पडला.'बाळूमामांच्या नावानं चांगभलं 'चा जयघोष करत, भंडाऱ्याची मुक्तहस्ते उधळण, ढोलकैताळाच्या गगनवेधी आवाजात राधानगरी- निपाणी मार्गावर निढोरी, आदमापूर मार्गावर रथोत्सव सुमारे ४ तास चालला. बाळूमामा देवालयाचे मानकरी कर्णसिंह धैर्यशीलराजे भोसले यांच्या हस्ते रथाची पूजा करण्यात आली.भंडाऱ्याच्या निमित्ताने महाप्रसादाच्या आदल्या दिवशी या सर्व बग्गी निढोरीत एकत्र आल्या. या बगीच्या घागरींचे भाविक ग्रामस्थ, महिलांनी औक्षण करून स्वागत केले.तब्बल चार तास चाललेल्या या रथोत्सवात भाविक भक्तीरसात तल्लीन झाले होते.ढोल कैताळाच्या आवाजात धनगरी बांधव दंग झाले होते .हलगी घुमक्याच्या ठेक्यावर अश्व देखील नाचत होते.भंडा-याच्या मुक्त हस्ते उधळीत बाळूमामांच्या नावानं चांगभल ऽऽऽऽअशा जयघोषात परिसर दुमदुमला होता. उत्साही भक्तांनी जेसीबीतून भंडाऱ्याची उधळण केली. यावेळी मार्गावर नक्षीदार रांगोळी, रंगी- बेरंगी फुलांची पखरण, कीर्तन प्रवचन बरोबर टाळ-मृदंगाचा गजर, ढोल- ताशाचा दणदणाट, भंडाऱ्यांची मुक्त उधळण करीत 'बाळूमामाच्या नावानं चांगभलं!'चा जयघोष चालू होता.राजस्थान व मध्यप्रदेश मधील धनगर बांधवांनी सुमारे पन्नास लाख रुपये खर्चून दिलेल्या रथामध्ये बाळूमामांची १३८किलो चांदीची मूर्ती बसवण्यात आली होती .रथाला फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. मिरवणूक सुरक्षित व शांततेत पार पाडणेसाठी पोलीस,होमगार्ड ,सेवेकरी यांचे योगदान मोठे होते. बाळूमामा भक्त भक्तांना मोफत खिचडी, फळे, ताक व सरबत वाटत होते. या मिरवणुकीमध्ये धैर्यशील भोसले, दत्तात्रय पाटील, दिनकरराव कांबळे, यशवंत पाटील, विजय गुरव, प्रशासकीय समिती सदस्य रागिणी खडके यांच्यासह भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दुधाच्या घागरी नेण्याची प्रथा ...महाराष्ट्र- कर्नाटकसह लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आदमापूरच्या संत सद्गुरु बाळूमामांच्या भंडारा उत्सवास निढोरी येथून रथातून दुधाच्या घागरी नेण्याचा धार्मिक सोहळा भक्तीमय वातावरणात पार पडण्याची प्रथा रूढ झाली आहे. भंडारा उत्सवामध्ये खिरीचा महाप्रसाद महत्त्वाचा कार्यक्रम मानला जातो. बाळूमामा स्वतः बकऱ्यांच्या कळपातील मेंढ्यांच्या दुधाची घागर महाप्रसादामध्ये वापरायचे. तीच प्रथा आजही भाविकांनी कायम ठेवली आहे.