नृसिंहवाडी : गुरुवारी श्री क्षेत्र नृसिंहवाडी दत्त जयंतीनिमित्त अखंड दत्त नामाने दुमदुमली. ‘दिगंबरा, दिगंबरा ...’ च्या अखंड गजरात व ‘श्री गुरुदेव दत्त...’ च्या भजनात कृष्णा-पंचगंगा संगमतीर्थावर भक्तिमय वातावरणात श्री दत्त महाराजांच्या राजधानीत गुरुवारी सायंकाळी पाच वाजता श्री दत्त जन्मकाळ सोहळा मोठ्या उत्साहात झाला.गुरुवारी दत्त जयंतीनिमित्त येथील श्री दत्त मंदिरात अनेक धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. दुपारी साडेबारा वाजता ‘श्रीं’च्या चरणकमलांची महापूजा करण्यात आली. महापूजा झाल्यावर भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले. दुपारी तीन वाजता येथील ब्रह्मवृंदामार्फत पवमान पंचसुक्त पठण करण्यात आले. साडेचार वाजता ‘श्रीं’ची उत्सवमूर्ती श्री नारायणस्वामी महाराज यांच्या मंदिरातून वाजतगाजत मुख्य मंदिरात आणण्यात आली. हरिभक्त पारायण ह.भ.प. वामनराव जोशी (सांगली) यांच्या कीर्तनानंतर ठीक पाच वाजता धार्मिक वातावरणात लाखो भाविकांच्या उपस्थितीत विधिवत श्री दत्त जन्मकाळ सोहळा झाला. रात्री दहानंतर मंदिरात धूप, दीप, आरती व पालखी सोहळा पार पडला. दत्त जयंतीनिमित्त पालखी व दत्त मंदिर परिसर पुणे येथील शेखर शिंदे व परिवार यांनी आकर्षक फुले व पानांनी सजविला होता.उत्सवाचे मानकरी भालचंद्र श्रीपाद पुजारी यांच्या घरी दर्शनासाठी जन्मकाळाचा पाळणा ठेवण्यात आला. तेथेही भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.दत्त देव संस्थानचे विश्वस्त, ग्रामपंचायतीचे सदस्य, शासकीय अधिकारी, जीवन मुक्ती संघटना कोल्हापूर, एस. के. पाटील व दत्त महाविद्यालय, कुरुंदवाड व श्री दत्त विद्यामंदिर हायस्कूलचे विद्यार्थी, स्वयंसेवक यांनी तसेच दत्त देव संस्थान व ग्रामपंचायतीचे कर्मचारी व स्वयंसेवकांनी अथक परिश्रम घेऊन यात्रेचे नेटके नियोजन केले.दत्त जयंती सोहळ्यात भाविकांमध्ये मोठा उत्साह दिसून येत होता. भाविकांनी पहाटे तीनपासून रात्री उशिरापर्यंत दर्शनासाठी गर्दी केली होती. भाविकांनी येथील प्रसिद्ध पेढ्यासोबत खवा, बासुंदी, आंबा बर्फी, कवठ बर्फी, करदंठ, आदी मिठाई तसेच किरकोळ खरेदीसाठी गर्दी केली होती.यावेळी ठिकठिकाणांहून वाद्यासह आलेल्या अनेक भजनी मंडळांनी भजने सादर केली. त्याला भाविकांनी चांगलाच प्रतिसाद दिला. इचलकरंजी शहर परिसरातइचलकरंजी : शहर परिसरात गुरुवारी दत्त जयंती विविध उपक्रमांनी व भक्तिमय वातावरणात उत्साहात साजरी करण्यात आली. दरम्यान, जय महादबा फौंडेशनच्यावतीने नृसिंहवाडी ते इचलकरंजी दिंंडी काढण्यात आली. यामध्ये भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.शहरातील गद्रे दत्त मंदिर, नगरपालिका, यशवंत कॉलनी, लिगाडे मळा यासह विविध ठिकाणी सामुदायिक ‘श्रीं’चा जन्मसोहळा सायंकाळी पार पडला. अनेक ठिकाणी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. चंदूर (ता. हातकणंगले) येथील दत्त मंदिरातही अभिषेक, पूजा व सायंकाळी दत्त जन्मकाळ असे धार्मिक कार्यक्रम व महाप्रसाद पार पडला. जय महादबा फौंडेशनच्यावतीने दरवर्षी नृसिंंहवाडी ते इचलकरंजी दिंंडीचे आयोजन करण्यात येते. यावर्षीही पहाटे ५ वाजता नृसिंंहवाडी येथील महादबा पाटील महाराज मठापासून या दिंडीला प्रारंभ झाला. तेथून दिंडी शाहू पुतळ्याजवळ आली. याठिकाणी दिवसभर भजन, कीर्तन आणि बाळ महाराज यांचा सत्संगाचा कार्यक्रम झाला. यावेळी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. मलकापूर परिसरमलकापूर : मलकापूर परिसरात विविध धार्मिक कार्यक्रमांनी दत्त जयंती साजरी करण्यात आली. मलकापूर, कडवे, वारूळ, आदी गावांत महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.कडवेपैकी लाळेवाडी येथे गुरुवारी सकाळी श्री दत्त मूर्तीस विष्णू महाराज-लाळेवाडीकर यांच्या हस्ते अभिषेक घालण्यात आला. गावातून टाळ-मृदंगाच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. वारूळ येथे दिवसभर धार्मिक कार्यक्रम पार पडले. जोतिबा येथे दत्त जयंतीजोतिबा : श्री क्षेत्र जोतिबा डोंगरावर ‘दिगंबरा दिगंबरा...ऽऽ श्रीपाद वल्लभ दिगंबरा...ऽऽ’च्या जयघोषात श्री दत्त जन्मकाळ सोहळा मोठ्या धार्मिक उत्साहात पार पडला. हजारो भाविकांनी दत्त मंदिरात प्रसादाचा लाभ घेतला.श्री दत्त जयंती सोहळ्यानिमित्त होमहवन, भजन, डवरी गीतांचा कार्यक्रम झाला. सायंकाळी ६.३० वाजता श्री गुरुदेव दत्त यांचा पाळणा गीत सादर करून श्री दत्त जन्मकाळ सोहळा झाला. यावेळी आकर्षक फुलांनी सजविलेल्या पाळण्यावर दत्त भक्तांनी पुष्पवृष्टी करून मनोभावे दर्शन घेतले. सुंठवडा, आतषबाजी, प्रसाद वाटप करण्यात आला.
‘दिगंबरा, दिगंबरा ...’ चा अखंड जयघोष
By admin | Published: December 24, 2015 11:24 PM