मोहन सातपुते
उचगाव : खाऊचा गाडा चालवून उदरनिर्वाह करणाऱ्या लेकीचा अपघातात बळी गेला अन् तिच्या चिमुकल्या तीन मुलांच्या संगोपनाची जबाबदारी आजीवर पडली. या खमक्या आजीने रक्ताच्या नात्यांना मायेचा आधार दिला खरा; पण वयोमान आणि परिस्थितीने तिच्याही मायेला पोरकेपणा आणला आहे. त्यामुळे आईविना आजीच्या कुशीत वाढणाऱ्या या चिमुकल्यांना आता दानशूरांच्या दातृत्वाची गरज निर्माण झाली आहे. उजळाईवाडीतील मालूबाई भुजाजी सानप या आजीने आता पोरक्या नातवांना दानशूरांनी आधार द्यावा, अशी साद घातली आहे. मालूबाई यांची एकुलती एक मुलगी उषा. तिची दोन लग्ने झाली होती. मात्र, दोन्ही नवऱ्यांनी सोडल्यामुळे उषा आपल्या आईसह गोकुळ शिरगाव येथे नाष्ट्याचा गाडा सुरू करून उदरनिर्वाह करत होती. मात्र, काही दिवसांपूर्वी अपघातात उषाचे निधन झाल्याने तिची तिन्ही मुले विजय मोहन पुजारी (वय-१२), दुर्वा विवेक राणे (वय-६), प्रेम विवेक राणे (वय-९) ही उघड्यावर आली. लेकीच्या माघारी मालूबाईने तिन्ही नातवांना सांभाळण्यासाठी कंबर कसली. सध्या ती उजळाईवाडीत भाड्याच्या घरात राहत आहे. मात्र, परिस्थितीने ती हतबल आहे. लेकीच्या कष्टावर कुटुंब चालायचे. मात्र, तिच्या माघारी परवड होत असल्याने नातवांना कुणी तरी आधार द्यावा यासाठी मालूबाई डोळे लावून बसली आहे.
कोट : मी आता परिस्थितीपुढे हात टेकले आहेत. कोणाचाही आधार नाही. मी वृद्ध, या तीन पोरांचा सांभाळ कसा करणार. त्यामुळे समाजातील दानशूर व्यक्ती व संस्था यांनी मदतीचा हात देऊन तीन मुलांना आधार द्यावा.
- मालुबाई सानप, आजी
मालूबाई लढली... पण नियतीने हरविले
लेक लहान असतानाच मालूबाईच्या पतीचे निधन झाले. त्यामुळे कुटुंबाचा गाडा हाकण्यासाठी मालूबाईने रामानंदनगर, पाचगाव, शिरगाव, उचगाव येथे कांदा- बटाटे विकण्याचा व्यवसाय सुरू केला होता. मात्र, कोरोना काळातील लॉकडाऊनमध्ये हा व्यवसाय बंद करून गडमुडशिंगीत नाष्टा गाडा सुरू केला. तिथे जम बसला नाही म्हणून मालूबाईने लेकीच्या साथीने गोकूळ शिरगावात गाडा लावला. मात्र, गांधीनगरला साहित्य आणायला जात असताना लेक उषाचा अपघाती मृत्यू झाला. त्यामुळे प्रत्येक टप्प्यावर संघर्ष करणाऱ्या मालूबाईला नियतीने हरविले.
फोटो : उचगाव मालूबाई
ओळ: वृद्ध मालूबाई भुजाजी सानप यांच्यावर तीन मुलांची जबाबदारी आली आहे. निरागसपणे आपल्या आजीला बिलगून राहिलेली मुले.