आंबा: चांदोली अभयारण्यग्रस्तांच्या घर बांधणी अनुदानासाठी चार कोटी दहा लाख रुपयांचा निधी प्राप्त झाल्याची माहिती श्रमिक मुक्ती दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांनी दिली. सलग पंचेचाळीस दिवस अभयण्यग्रस्तांनी जिल्हा वन विभागाच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले होते. त्यातील आश्वासनानुसार प्रस्तावित घर अनुदानापोटी सदर निधी उपलब्ध झाला आहे. उपलब्ध रक्कम सर्व अभयण्यग्रस्तांना पुरेल इतकी नसल्याने पात्र कुटुंबाला अनुदान मिळावे म्हणून संघटनेच्या स्तरावर प्रत्येक प्रकल्पग्रस्तांना रु. ५१४०० वाटप करण्याचा निर्णय घेतला असून त्याप्रमाणे ती रक्कम प्रत्येक लाभार्थ्याच्या बँक खात्यामध्ये जमा करण्याचे काम वन प्रशासनाकडून सुरू असल्याची माहिती संघटक जगन्नाथ कुडतुडकर यांनी दिली.नऊशे सतरा खातेदारांना दीड लाख रुपयांप्रमाणे चौदा कोटी रुपये निधीची गरज आहे. पण, प्रत्यक्षात साडेचार कोटींपर्यंत निधी उपलब्ध झाल्याचे राज्य सचिव मारुती पाटील यांनी स्पष्ट केले. वारूळ पैकी गोठणे येथील वसाहतीमधील अभयरण्यग्रस्तांना सहा हेक्टर ४४ आर शेतजमिनीचे आठवड्यात वाटप करण्याची वन प्रशासनाने ग्वाही दिली होती. पण, महिना झाला तरी शेतजमीन वाटपाचे एक पाऊलही पुढे पडले नसल्याचे गोठणे येथील अभयण्यग्रस्त धोंडीबा पोवार यांनी खंत मांडली. ९१७ खातेदारांपैकी सुमारे तीस टक्के खातेदारांची संकलन दुरुस्ती प्रलंबित आहे.
चांदोली अभयारण्यग्रस्तांना चार कोटींचे अनुदान
By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2024 4:28 PM