कोल्हापूर : गेल्या महिन्यात आलेल्या पंचगंगा नदीच्या महापुराने पाणी घरात गेलेल्या शहरातील १० हजार २४५ कुटुंबांना प्रत्येकी १० हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान मिळणार आहे. महापालिका प्रशासनाने केलेल्या पंचनाम्याच्या अंतिम अहवालावरून हे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, मंगळवारी १ हजार ९ कुटुंबांच्या बँक खात्यावर महसूल प्रशासनाने दहा हजारांची सानुग्रह अनुदान जमा केल्याचा दावा महसूल यंत्रणेने केला आहे.
यंदाच्या महापुराने नुकसान झालेल्यांना भरपाई देण्यासंबंधी महसूल आणि वन विभागाने ११ ऑगस्ट २०२१ मध्ये सविस्तर आदेश काढला आहे. यानुसार महसूल प्रशासनातर्फे भरपाई दिली जात आहे. त्यात सानुग्रह अनुदानापोटी कपड्यांच्या नुकसानीपोटी ५ हजार, घरगुती भांडी नुकसानीपोटी ५ हजार, असे १० हजार रुपये, पूर्ण पडलेल्या कच्च्या-पक्क्या घरासाठी दीड लाख, पन्नास टक्के पडलेल्या घरास ५० हजार, पंचवीस टक्के पडलेल्या घरास २५ हजार रुपये, पंधरा टक्के पडलेल्या घरास १५ हजार रुपये, नुकसानग्रस्त कारागिरांना आणि नुकसानग्रस्त दुकानदारांना एकूण नुकसानीच्या ७५ टक्के रक्कम किंवा जास्तीत जास्त ५० हजार रुपये दिले जाणार आहे. याशिवाय महापूर काळात विस्थापित झालेल्या कुटुंबातील प्रौढ सदस्यास प्रत्येकी ६० रुपये, तर लहान मुलांना प्रत्येकी ४५ रुपये देण्यात येणार आहे. यापैकी सध्या केवळ सानुग्रह अनुदानासाठी सरकारकडून निधी मिळाला आहे. इतर नुकसानीच्या भरपाईपोटी निधी प्राप्त झालेला नाही. त्यामुळे संबंधित नुकसानग्रस्तांना महापूर येऊन महिना झाला तरी भरपाईसाठी प्रतीक्षाच करावी लागत आहे. यामुळे संबंधितात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
चौकट
आकडे बोलतात
शहरात महापुराचे पाणी घुसलेल्या कुटुंबांची संख्या : १०,२४५
महापूर काळात विस्थापित कुटुंबांची संख्या : ४, ४६८
महापुराचे पाणी गेलेल्या व्यावसायिक आस्थापनाची संख्या : ३३७०
नुकसानग्रस्त कारागिरांची संख्या : ४१०
पडझड झालेल्या जनावरांच्या गोठ्यांची संख्या : १०८
पडझड झालेल्या घरांची संख्या : १२२
चौकट
३३ पथकांतर्फे पंचनामा
महापालिका कार्यक्षेत्रात महापुराने झालेल्या नुकसानीचा पंचनामा ३३ पथकांतर्फे करण्यात आला आहे. या पथकांनी २९ जुलैपासून पंचनामा केले आहेत; पण अजूनही महापुराने शहरतील किती मालमत्ताधारकांचे एकूण नुकसान किती झाले आहे, याची नेमकी आकडेवारी एकत्र करण्यात महापालिका प्रशासनास यश आलेले नाही.
कोट
महापुराने बाधित शहरातील कुटुंबांचा पंचनामा पूर्ण झाला आहे. अहवाल एकत्रीकरण करून महसूल प्रशासनाकडे पाठवण्याची प्रक्रिया सुरू आहे. बाधित कुटुंबांना सरकारच्या निकषाप्रमाणे महसूल प्रशासन भरपाई देईल.
-विनायक औंधकर, सहायक आयुक्त
कोट
पूरपरिस्थितीने बाधित झालेल्या कुटुुंबांना १० हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान वाटपाचे काम सुरू झाले आहे. शहरातील १ हजार ९ बाधित कुटुंबांच्या नावे सरकारच्या निकषाप्रमाणे प्रत्येकी दहा हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान वर्ग केले आहे.
-वैभव नावडकर, प्रांताधिकारी, करवीर