कोल्हापूर : कोल्हापूरची माहेरवाशिणी असलेल्या फॅॅशन डिझायनर श्रद्धा निकम-चड्ढा या कोरोनाच्या सद्य:स्थितीत गुरगाव (दिल्ली) मधील गरजू भुकेल्यांना अन्नाचा घास देत आहेत. स्वत: घरी जेवण तयार करून त्या रोज शंभर जणांना ते मोफत पुरवीत आहेत. आतापर्यंत त्यांनी सुमारे तीन हजार जणांना जेवण पुरविले आहे.न्यू पॅलेस परिसरात राहणाऱ्या ज्योती आणि किरण निकम यांची कन्या असणाऱ्या श्रद्धा यांचा गुरगावमध्ये फॅॅशन डिझायनिंगचा स्टुडिओ असून, त्यांचे पती सौरभ चड्ढा हे ग्राफिक डिझायनर आहेत. कोरोनाच्या सद्य:स्थितीत काही गरजू, कोरोनाबाधित असलेले लोक, काही वृद्धांना जेवण मिळत नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यावर त्यांनी अशा लोकांना जेवण पुरविण्याचा निर्णय घेतला.
स्वत:च्या घरी चपाती, भाजी, भात, वरण आणि कोशिंबीर तयार करून त्याचे पॅॅकेटस करून ते वाटप करण्यास दि. १ मेपासून त्यांनी सुरुवात केली. प्रारंभी सकाळी आणि सायंकाळी अशी ३० जणांना त्यांनी जेवण देणे सुरू केले. दोन आठवड्यांत ही संख्या ११० पर्यंत पोहोचली. सध्या रोज शंभर जणांना त्या जेवण देत आहेत. या कामात त्यांना सासू मीनाक्षी, पती सौरभ, मुलगी रिधीमा आणि घरातील दोन महिला कर्मचाऱ्यांची मदत होते. स्व:खर्चातून गरजूंना जेवण पुरवून त्यांनी सामाजिक बांधीलकी जपली आहे.
सामाजिक बांधीलकी जपण्याच्या उद्देशाने मी गरजूंना जेवण पुरविणे सुरू केले. त्यासाठी माझ्या कुटुंबीयांचे मोठे पाठबळ लाभले. या उपक्रमातून एक वेगळे समाधान लाभते. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होईपर्यंत गरजूंना जेवण देणार आहे.-श्रद्धा निकम