कोल्हापूर : माणुसकी आणि आपुलकी दाखवायची आहे, याच उद्देशाने ‘एक घास... भुकेलेल्यांसाठी!’ या उपक्रमाला प्रतिसाद देत रविवारचा दिवस बिंदू चौकात ‘रोटी डे’ म्हणून साजरा करण्यात आला. आवाहनानुसार जमा झालेली भाकरी, चपाती, भाजी व इतर शिजविलेले पदार्थ गरजवंतांपर्यंत पोहोचविण्यात आले. कोल्हापूर यूथ मुव्हमेंटस्च्या वतीने या उपक्रमाचे आयोजन केले होते.दरवर्षी चॉकलेट डे, व्हॅलेंटाईन डे, टेडी डे, रोज डे साजरे केले जातात; पण भुकेलेल्यांसाठीही डे साजरा करण्याची वेळ आज आली आहे. त्यासाठी कोल्हापूर यूथ मुव्हमेंटस्च्या वतीने गतवर्षीपासून ‘रोटी डे’ साजरा करण्यात येत आहे. यंदाही रोटी डेसाठी बिंदू चौकात भाकरी, चपाती, भाजी, भात यांपैकी शिजविलेले अन्नपदार्थ या संस्थेकडे जमा करण्याचे आवाहन केले होते. त्या आवाहनास प्रचंड प्रतिसाद लाभला.
काहींनी भाकरी, चपाती, भाजी; तर काहींनी धान्य, बिस्किटांचे पुडे देऊन या उपक्रमाला हातभार लावला. याच ठिकाणावरून गरजूंना हे अन्नदान करण्यात आले. दिवसभर जमा केलेले शिजविलेले अन्नपदार्थ सायंकाळी कार्यकर्त्यांनी बिंदू चौकासह दसरा चौक, शेंडा पार्कमधील कुष्ठपीडित शाळा, रेल्वे स्टेशन, टेंबलाई मंदिराचा परिसर, तावडे हॉटेल परिसर, आदी भागांतील फिरस्ते व गरजूंना वाटप करण्यात आले.याशिवाय जमा झालेले धान्य येत्या चार दिवसांत विनाअनुदानित आश्रमशाळा, एडस्ग्रस्त विद्यार्थीशाळा, आदी ठिकाणी वाटप करण्यात येणार असल्याचे संस्थेचे अध्यक्ष प्रणव कांबळे यांनी सांगितले. रविवारी दिवसभर अध्यक्ष प्रणव कांबळे, उपाध्यक्ष अक्षय चौगुले, नीलेश बनसोडे, स्नेहल शिर्के, शिवराम बुधिहाळकर, समीर जमादार, गिरीश सावंत, नीलम माळी, वसुधा निंबाळकर, शीतल पदारे यांनी उपक्रमात सहभाग घेतला.दिवसभरात जमा झालेले अन्न व धान्य
- चपाती-भाकरी-भाजी : १०००
- जिलेबी : १० किलो
- केळी : १ डझन
- साखर : ५ किलो
- तांदूळ : ३५० किलो
- राईस पॅकेट : २००
- डाळ : ४ किलो
- बटाटा वेफर्स पााकिटे