कोल्हापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्याच्या लॉकडाऊनमध्ये रोज दोनशे भुकेल्यांना घास देण्याचे काम राजलक्ष्मीनगरमधील नागरिक, तरुणाई करीत आहे. रोज सकाळी, सायंकाळी दोनशे जणांना चपाती-भाजी वाटप करून ते सामाजिक बांधिलकी जपत आहेत.
आपण काही तरी समाजाचे देणे लागतो या हेतूने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. कोरोना संकटसमयी समाजाला मदतीचा हात दिला पाहिजे. या उद्देशातून सायबर इन्स्टिट्यूट येथे व्हिजन चॅॅरिटेबल ट्रस्टने मोफत कोविड केअर सेंटर सुरू केले आहे. या उपक्रमातून प्रेरणा घेऊन कोरोनाच्या या संकटात खारीचा वाटा उचलावा म्हणून राजलक्ष्मीनगरमधील तरुणाईने रोज सकाळी आणि संध्याकाळी दोनशे गरजूंना मोफत चपाती-भाजी पुरविण्यास सुरुवात केली. गेल्या १५ दिवसांपासून या उपक्रमाअंतर्गत ही तरुणाई व्हिजन ट्रस्टच्या कोविड सेंटरमध्ये चपाती-भाजी पुरवीत आहेत. या उपक्रमाची सुरुवात मिलिंद पाटील, संग्राम पाटील, इंद्रजित साळोखे, नीलेश निकम, विश्वेश कुलकर्णी, अजित साळोखे यांनी केली. या उपक्रमासाठी मदतीचे हात पुढे आले आहेत.
चौकट
महिलांचे योगदान
या उपक्रमामध्ये राजलक्ष्मीनगरमधील महिलादेखील सहभागी होऊन योगदान देत आहेत. रोज सात-आठ कुटुंबातील महिला या चपाती-भाजी करून देत आहेत. जोपर्यंत सेंटर चालू असेल, तोपर्यंत हा उपक्रम सुरू ठेवण्याचा निर्धार या तरुणाईने केला आहे.