ऑनलाइन लोकमत
कोल्हापूर, दि. 4 - दहावीचा निरोप समारंभ कार्यक्रम आवरुन घरी जाणा-या चौघा शाळकरी मुलांना तिघा लुटारुंनी मारहाण करुन चाकुचा धाक दाखवून चार मोबाईल व रोख रक्कम असा सुमारे पन्नास हजार रुपयांचा मुद्देमाल जबरदस्तीने काढून घेत पोबारा केला. शनिवारी भरदिवसा साडेअकराच्या सुमारास मेरी वेदन मैदानावरील फुटपाथवर ही घटना घडली. भयभित झालेल्या मुलांनी घरी जावून कुटूंबियांना हा प्रकार सांगितला. त्यानंतर शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलिस निरीक्षक प्रविण चौगुले यांनी मुलांनी लुटारुंचे सांगितलेले वर्णन आणि सीसीटीव्ही फुटेजवरुन विचारेमाळ येथील तिघांना अवघ्या पाच तासात अटक केली. चैनीसाठी लुटमार केल्याची त्यांनी कबुली दिली. पोलिसांनी सांगितले, अभिषेक अजित वाळवेकर (वय १६), श्रावण यशवंत शेट्टी (१६), प्रथमेश संजय सुर्वे (१६), प्रणव शैलेंद्र गाडेकर (१६, सर्व रा. रमणमळा, कसबा बावडा) हे चौघे सेंट झेवियर्स स्कुलमध्ये दहावीमध्ये शिकतात. शनिवारी त्यांचा निरोप समारंभाचा कार्यक्रम होता. कार्यक्रम संपल्यानंतर हे चौघे चालत घरी निघाले होते. मेरी वेदन मैदानासमोरील फुटपाथवरुन जात असतांना पाठिमागून मोटरसायकलवरुन तिघे तरुण आले. त्यांनी या चौघांना अडवून थेट मारहाण केली. अचानक घडलेल्या प्रकाराने चौघेही बिथरुन गेले. तिघापैकी एका तरुणाने चाकु दाखविताच भितीने तिघेही थरथरले. यावेळी चौघाच्या खिशातील मोबाईल व पैसे काढून त्यांनी पलायन केले.
या रस्त्यावरुन वाहनधारकांची ये-जा सुरु होती. त्यांच्या समोरच हा प्रकार घडला. मारहाण होत असतांना मुलांकडे विचारपूस करण्याचे धाडस कोणीही केले नाही. चौघाही मुलांचे अंग भितीने घामाघुम झाले होते. त्यांनी तेथून थेट घर गाठले. घडलेला प्रकार आई-वडीलांना सांगितला. त्यानंतर चौघांचेही पालक शाहूपुरी पोलिस ठाण्यात आले. त्यांनी पोलिस निरीक्षक प्रविण चौगुले यांची भेट घेवून माहिती दिली. भरदिवसा या रस्त्यावर लुटमार झाल्याने पालक वर्गात भितीचे वातावरण पसरले आहे.