सरदार चौगुले ।पोर्ले तर्फ ठाणे : लग्न सोहळ्यातील प्रत्येक घटकाला अनन्य साधारण महत्त्व आहे. त्याचप्रमाणे नवदाम्पत्याची धुमधडाक्यात काढली जाणारी वरात सुद्धा त्याचाच एक अविभाज्य घटक मानला जातो. पूर्वी बँडबाजा बारात अशी क्रेज असणाऱ्या वरातीपुढे डीजे बेस बढाके धकधक करीत धिंगाण्यासोबत पिंगाणा घालून वरात काढण्याची प्रथा सर्वत्र अनुभवण्यास मिळत आहे. वरातीच्या दिमतीला साऊंड सिस्टीम आवाज, उजेड पाडणारा लाईट लेझर शो, झगमगीत बग्गी, तरुणाईला डोलविणारी मदिरा आणि फटाक्यांची आतषबाजी या सर्वांच्या खर्चाचा ताळमेळ केला, तर लग्नापेक्षा वरातच महागली आहे.
लग्न हा प्रत्येक व्यक्तीच्या जीवनातील आणि कुटुंबातील मंगलमय क्षण मानला जातो. लग्न सोहळ्याच्या आनंदात अवघं कुटुंंब न्हाऊन निघत असते. बदलत्या समाज रचनेच्या प्रक्रियेत मात्र या मंगलमय क्षणाचे संकेत बदलू पाहत आहेत आणि तसे प्रयोगही अनुभवण्यास मिळत आहेत. लग्न सोहळ्यात हळद, अक्षता आणि वरात या व्यवस्थेतील भपकेबाजपणा लग्नाचा दर्जा वाढवितो. वरातीवेळी तो प्रकर्षाने जाणवतो.
ग्रामदैवतेचे दर्शन घेण्यासाठी नवरा-नवरीचा ओळखीचा भाग म्हणून वरात काढली जाते. पूर्वी बैलगाडीवर माच्या (लाकडी कॉट) टाकून वरात काढली जायची. बदलत्या संकल्पनेनुसार ट्रॅक्टरची बग्गी आणि आता रथातून वरात काढण्याची फॅशन रूढ झाली आहे. हालगी-लेझीम, दाणपट्टा, झांजपथक या वाद्यांच्या तालात वरात काढली जायची. मंडळाच्या कार्यकर्त्यांची वरात असल्याने शे-पाचशे रुपयांमध्ये निघायची. पुढे वरातीला बँडबाजा, बेंजोचा सूर आला; पण तो ही साऊंड सिस्टीमच्या धक्क्याने गायब आहे.
वरातीच्या मूळ उद्देशाला बगल मिळाल्याने ईर्ष्या आणि प्रतिष्ठेचा शिरकाव झाला आहे. ज्याच्या वरातील साऊंड सिस्टीमचा बेस जादा, लाईट, लेझर शोचा झगमगाट दांडगा, फटाक्यांची आतषबाजी आणि बेधुंद होऊन नाचणाºयांची संख्या जास्त, त्यांच्याच वरातीची भागात चर्चा, अशी काहिशी मानसिकता नवरदेवासह मित्रमंडळीसह दिसत आहे.साऊंड सिस्टीम नसणे कमीपणाचे...शहरापेक्षा ग्रामीण भागातील विवाह सोहळ्यात वरात आणि साऊंड सिस्टीमचे अतूट नाते निर्माण झाले आहे. वरातीत साऊंड सिस्टीम नसणे कमीपणाचे मानले जाते. कारण साऊंड सिस्टीम कर्कश आवाजावर मदहोश होऊन मनमुराद धिगांना घालायला मिळतो. दुसºयाच्या वरातीत आपली हौस भागविणाºया मित्रांची संख्या काही कमी नाही; परंतु मित्रमंडळीच्या हौसेपोटी वरातीवर होणारा खर्च चिंताजनक बनत आहे.वरातीवर होणारा खर्चसाऊंड सिस्टीम (बेसवर) - १५ ते २० हजारपर्यंत.जनरेटर - तीन हजारपर्यंत.लाईट लेझर शो - ५ ते १० हजारपर्यंत.बग्गी - ५ ते १० हजारपर्यंत.फटाके हौसेनुसार -३ ते ५ हजारपर्यंत.